मुंबई  : पक्ष बदलणे किंवा पक्षामध्ये इनकमिंग करून घेण्याचं काम हे फक्त भाजप करत नाही तर अन्य पक्षांमध्येही अशी इनकमिंग सुरूच असते, दुसऱ्या पक्षातील अनेक लोकं आमच्याकडे यायला अजूनही तयार आहेत मात्र आम्ही त्यांना घेतलं नाही, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. ते एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांना भाजपमध्ये अन्य पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला जे हवे होते ते सगळे नेते आम्ही आतापर्यंत भाजपमध्ये घेतले आहेत. अजूनही भाजपमध्ये येण्यासाठी अनेकजण तयार आहेत, मात्र त्यांना आम्ही घेतले नाही, असे दानवे म्हणाले.

दुसऱ्या पक्षातून आयात करण्याची परंपरा केवळ भाजपमध्येच नाही तर ती काँग्रेसमध्येही आहे, असे त्यांनी यावेळी उदाहरणांसहित सांगितले.

ईशान्य मुंबईचा उमेदवार उद्या ठरणार, रावसाहेब दानवेंचं स्पष्टीकरण


ईशान्य मुंबईतून भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार याचा निर्णय उद्या (सोमवार, 1 एप्रिल) होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.  मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य ) मतदार संघातून भारतीय जनता पक्षाने अद्याप कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. या मतदार संघातील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा विरोध आहे.

त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी रखडली असल्याचे बोलले जात आहे. ईशान्य मुंबईतून पुन्हा एकदा उमेदवारी मिळावी यासाठी किरीट सोमय्या खूप प्रयत्न करत आहेत, तसेच त्यांनी मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यामध्ये सोमय्या यांना अपयश आले. सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, "प्रत्येक पक्षाचे एक धोरण असते. सर्व मतदार संघातील उमेदवार एकाच दिवशी जाहीर करायचे नसतात. सोमय्यांची उमेदवारी रखडण्यामागे शिवसेनेचा विरोध हे कारण असूच शकत नाही. भारतीय जनता पक्षाची एक संसदीय बैठक होणार आहे. या बैठकीत ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा फैसला होईल."