जळगाव : भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे, त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार असल्याचंही खडसे म्हणाले. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटणार होत असं सांगताना एकनाथ खडसे म्हणाले.

मुक्ताईनगर येथे भाजपने एकनाथराव खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावत, सेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील याना आपला पाठिंबा दर्शविला आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो यावरुन मुक्ताई नगरमध्ये  राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे यावरुन लक्षात येत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.

तसेच माझ्या मुलीच्या उमेदवारी विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष बंडखोर उमेदवारास शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने पाठिंबा द्यावा अशा नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणावे का?, असा सवाल करीत खडसे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

VIDEO | नव्या पिढीसाठी मला तिकीट नाकारलं : एकनाथ खडसे | एबीपी माझा


खडसे यांना उमेदवारी न देण्यामागची प्रमुख कारणं  ही असू शकतात 


  •  एकनाथ खडसेंचे उपद्रवी मूल्य पक्षसंघटना आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरले होते.

  • 'विरोधी पक्ष नेता असतांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव मला तरी आढळलं नव्हतं' हे खडसेंनी केलेलं ताजं वक्तव्य पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.

  • खडसेंना या विधानसभेत पुन्हा संधी दिली तर पुढच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतच्या चर्चा आणि बातम्या सतत येत राहणार, जी मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरू शकेल.

  • सभागृहात ऑन रेकॉर्ड खडसे सरकारचे वाभाडे काढत आणि पक्षाला सतत तोंडघशी पाडत होते.

  • खडसेंनी सभागृहाबाहेर केलेली टीका किंवा पक्षविरोधी वक्तव्य एक वेळेस दुर्लक्षित करता आली असती पण सभागृहाच्या पटलावर काह विषय ऑन रेकॉर्ड आणणं सरकारसाठी जास्त अडचणीचे आणि नामुष्कीचे ठरत होते

  • सर्वात महत्वाचं म्हणजे खडसेंना उमेदवारी डावलून पक्षातील इतर उपद्रवी नेत्यांना एक कडक मेसेज देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.


Eknath Khadse | भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत : एकनाथ खडसे | जळगाव | ABP Majha



संबंधीत बातम्या :

एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी यांना उमेदवारी, कोण आहेत रोहिणी खडसे?

एकनाथ खडसेंना उमेदवारी का डावलली?