ठाणे: भाजपकडून रविवारी विधानसभा निवडणुकीसाठी 99 जणांची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजप यंदाच्या निवडणुकीत अँटी इन्कन्म्बन्सीचा फटका टाळण्यासाठी भाकरी फिरवेल आणि नव्या चेहऱ्यांना संधी देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपने (BJP Candidate list) आपल्या जुन्या शिलेदारांवरच विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. भाजपच्या या पहिल्या उमेदवारी यादीत ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांचीही नावे आहेत.
यापैकी भिवंडी पश्चिममधून महेश चौघुले यांना संधी देण्यात आली आहे. तर मुरबाडमधून विरोध असतानाही किसन कथोरे यांच्यावरच भाजपने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. डोंबिवली मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध आता ठाकरे गटाकडून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर ठाण्यातून भाजपचे निष्ठावंत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेला चेहरा असलेल्या संजय केळकर यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक यांना संधी देण्यात आली आहे. तसेच बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे.
या सगळ्यात कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. दोन दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी महायुतीला इशारा दिला होता. भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे महेश गायकवाड यांनी म्हटले होते. त्यामुळे आता सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीनंतर महेश गायकवाड काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातून कोणाकोणाला उमेदवारी?
नालासोपारा - राजन नाईक
भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
मुरबाड - किसन कथोरे
कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड
डोंबिवली - रवींद्र चव्हाण
ठाणे - संजय केळकर
ऐरोली - गणेश नाईक
बेलापूर - मंदा म्हात्रे
महायुतीच्या जागावाटपचा संभाव्य फॉर्म्युला
भाजप 158
शिवसेना (शिंदे गट) 85
राष्ट्रवादी काँग्रेस 45
आणखी वाचा