लखनौ : उत्तर प्रदेशमधील आणखी सात लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी आज भाजपने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यादीतून संत कबीर नगरमधील आमदाराला बुटाने मारहाण करणारे खासदार शरद त्रिपाठी यांचं पत्ता कट करण्यात आला आहे. शरद त्रिपाठींच्या जागी सपातून भाजपमध्ये आलेल्या प्रविण निषाद यांना उमेदवारी घोषित केली आहे.


गोरखपूरसह संत कबीरनगर आणि देवरिया जागेवरील उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या तीन जागांवर कोणत्या उमेदवाराला तिकीट द्यावं हे ठरवणं भाजपला कठीण झालं होतं. गोरखपूरमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत ही जागा समाजवादी पार्टीच्या खात्यात गेली होती. प्रविण निषाद याठिकाणी विजयी झाले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रविण निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आपलं तिकीटही निश्चित केलं.


उत्तरप्रदेशच्या संत कबीरनगरमध्ये मार्च महिन्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत शरद त्रिपाठी उपस्थित होते. या बैठकीत त्रिपाठी यांचा आमदार राकेश बघेल यांच्यासोबत वाद झाला होता. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं, ज्यात त्रिपाठींनी राकेश बघेल यांना थेट बुटाने मारहाण केली होती.


शरद त्रिपाठींच्या वडिलांनी तिकीट


भाजपने शरद त्रिपाठी यांचं तिकीट कापलं असलं तरी त्यांचे वडील आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रमापतीराम त्रिपाठी यांना देवरिया मतदार संघातून उमेदवारी घोषित केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतून पाच खासदारांचे नाव कापण्यात आले आहे. आता केवळ घोसी मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा बाकी आहे. तसेच योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना आंबेडकरनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.


अभिनेते रवी किशन यांनाही उमेदवारी


भोजपुरी सिनेमातील अभितेने रवी किशन यांनाही भाजपने संधी दिली आहे. रवी किशन गोरखपूर येथून भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असणार आहेत.