मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 99 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) मतदान होत आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली उमेदवारी (BJP Candidate list) प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये मुंबईतील 14 जणांचा समावेश आहे. 


भाजपकडून विधानसभा निवडणुकीत अँटी इन्कन्म्बसी फॅक्टरचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी मुंबईत भाकरी फिरवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, उमेदवारी यादीवर नजर टाकल्यास भाजपने जुन्या आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईत मतदारसंघात पराभव झालेल्या मिहीर कोटेचा यांना मुलुंडमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राम कदम (Ram Kadam) यांना घाटकोपर पश्चिम आणि तमिल सेल्वन यांना धारावीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या दोघांचे तिकीट खराब कामगिरीमुळे कापले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, राम कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये काशी यात्रा, अयोध्या यात्रांचा जो सपाटा लावला होता, त्याचा त्यांना जनसंपर्काच्यादृष्टीने फायदा झाला आणि त्यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. याशिवाय, आशिष शेलार (वांद्रे पश्चिम ) आणि त्यांचे बंधू विनोद शेलार (मालाड पश्चिम) या दोन्ही बंधूंना भाजपने उमेदवारी दिली आहे. 


याशिवाय, कुलाबा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे. तर मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघात पुन्हा एकदा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीनंतर आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपले उमेदवारी यादी कधी जाहीर करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लागले. भाजपच्या यादीनंतर आज रात्रीपर्यंत शिंदे गटाच्या 50 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


भाजपच्या मुंबईतील विधानसभा उमेदवारांची यादी



मुलुंड - मिहिर कोटेचा 
कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर 
चारकोप - योगेश सागर 
मालाड पश्चिम - विनोद शेलार
गोरेगाव - विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम - अमित साटम 
विलेपार्ले - पराग अळवणी 
घाटकोपर पश्चिम - राम कदम 
वांद्रे पश्चिम - आशिष शेलार 
सायन कोलीवाडा- कॅप्टन तमिल सेल्वन
वडाळा - कालिदास कोळंबकर 
मलबार हिल - मंगलप्रभात लोढा 
कुलाबा - राहुल नार्वेकर 



आणखी वाचा


मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट