धुळे : धुळे महापालिका निवडणुकीत मतदारांनी पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला विजयी केलं आहे. देवा सोनार असं देवा सोनार उर्फ देवेंद्र सोनार असं विजयी उमेदवाराचं नाव आहे. देवा सोनारने प्रभाग क्रमांक 10 ड मधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.
विजयी झाल्यानंतर देवा सोनारने मोठा जल्लोष केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनीही देवा सोनारसोबत विजयी जल्लोषात सहभागी झाले होते.
मार्च 2013 मध्ये होळीच्या दिवशी पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात देवा सोनार, चंद्रकांत सोनार या पितापुत्रांसह एकूण 20 ते 25 जणांनी हल्ला केला होता. या घटनेत एपीआय धनंजय पाटील हे गंभीर जखमी झाले होते, या प्रकरणी 307 चा गुन्हा देखील नोंद झाला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे.
धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली.
भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
संबंधित बातम्या
धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी
धुळे महापालिका निवडणुकीची वैशिष्ट्ये