नवी दिल्ली: भाजपने राज्यसभेसाठीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यावेळी भाजकडून (BJP) अनेक दिग्गजांचा आणि पक्षातल्या निष्ठावंतांचा पत्ता कट करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली नाही. तसचे  संघ विचारसरणीशी एकनिष्ठ असलेले विनय सहस्त्रबुद्धे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे.


भाजपकडून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना यावेळी राज्यसभेवर संधी नाही. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात नक्वी यांना संसदेचं सदस्यत्व मिळवता आलं नाही तर त्यांना मंत्रीपदही गमवावं लागणार आहे.


भाजपने महाराष्ट्रामध्ये आपले तीन उमेदवार जाहीर केले आहेत. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी आपले उमेदवारी अर्ज सोमवारी भरले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सहाव्या जागेसाठी आता शिवसेना आणि भाजप आमने-सामने येणार आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांचेसमोर शिवसेनेच्या संजय पवार यांचे आव्हान असेल. 


सहा जागेसाठी सात उमेदवार
महाराष्ट्रातून यावेळी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा लढणार आहेत. आतापर्यंत शिवसेनेने दोन तर भाजपने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतरही कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांना उद्या मुंबईत या असा संदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याने त्यांचाही अर्ज भाजपच्या वतीने दाखल होण्याची शक्यता आहेत. असं जर झालं तर सहाव्या जागेसाठी चुरशीची लढत पहायला मिळेल.


देशातल्या 15 राज्यातील 57 जागांवर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सर्व 57 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होत आहे. 57 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 21 जून ते 1 ऑगस्ट यादरम्यान संपत आहे. राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तयारी सुरु केली आहे. ज्या महत्त्वाच्या नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये काही दिग्गज नेत्यांचाही समावेश आहे.