मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीचा समावेश आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या समावेश आहे. तर आज जाहीर झालेल्या यादीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, तर काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे.


कोणत्या मतदारसंघात उमेदवार बदलले?


कामठी मतदारसंघात विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची टिकीट कापून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. तर पुण्यातील पिंपरी मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या जागी आता त्यांचे बंधू शंकर जगताप यांना संधी देण्यात आली आहे. कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांचं तिकीट कापलं मात्र, त्यांच्या पत्नीला सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे.


दानवेंच्या मुलाला तर चव्हाण यांच्या मुलीला संधी


आज भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. हे मतदारसंघ तुलनेने सुरक्षित आहेत. त्याचबरोबर बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. या यादीत भाजपा देवेंद्र फडणवीस,  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नावांचा समावेश केला आहे. तर भाजपाने अशोक चव्हाण यांच्या मुलीला या निवडणुकीमध्ये संधी दिली आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना देखील भाजपाने संधी दिली आहे. श्रीजया या भोकर मतदासंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोबतच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यांनादेखील भाजपाने तिकीट दिले आहे. ते भोकरदन या जागेवरून निवडणूक लढवतील.


पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील आता लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 


भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये 


- जिथे उमेदवार बदल नाही अशी नाव जाहीर 
- वादाच्या जागा पाहिल्या यादीत टाळल्या आहेत 
- उमेदवार बदलले जातील अशा जागा दुसऱ्या यादीत असतील 
- विदर्भात कुणबी उणेदवार अधिक 
- पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ सीटिंग गेटिंग
- मराठवाड्यात मराठा उमेदवार जास्त