पुणे: निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राज्यात घडामोडींना वेग आला आहे. आज भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये काही नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे, तर काही विद्यमान आमदांराना पुन्हा एकदा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. तसेच काही जणांची तिकीट कापण्यात आलं आहे. विषेश म्हणजे पुण्यातील ज्या महत्त्वाच्या ठिकाणच्या निकालाकडे राज्याचं लक्ष असतं त्या मतदारसंघामध्ये पुन्हा त्याच नेत्यांना संधी देण्यात आलेली आहे. फक्त चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीनंतर आमदार झालेल्या अश्विनी जगताप यांना तिकीट न देता, त्यांचे दिर शंकर जगतापांना तिकीट देण्यात आलेलं आहे. 


पुन्हा एकदा दौंड मतदारसंघातून राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप, शिवाजीनगर मधून सिध्दार्थ शिरोळे, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, तर पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ यांना पुन्हा भाजप पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. या पुण्यातील महत्त्वांच्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अनेक नेते निवडणूक लढवण्यात इच्छुक होते, मात्र पक्षांने ही जबाबदारी ज्या-त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या खांद्यावर टाकली आहे. चिंचवड वगळता बाकी मतदारसंघात विद्यमान आमदारांना संधी दिली आहे. 


दौंड - राहुल कुल


भोसरी - महेश लांडगे


चिंचवड - शंकर जगताप


शिवाजीनगर - सिध्दार्थ शिरोळे


कोथरूड - चंद्रकांत पाटील


पर्वती - माधुरी मिसाळ


उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सिध्दार्थ शिरोळेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 


पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह जल्लोष पाहायला मिळतोय. मिठाई भरून सिद्धार्थ शिरोळे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यंदाही आमचाच विजय होईल असा विश्वास सिद्धार्थ शिरोळे यांनी दर्शवला आहे. 


अश्विनी जगताप यांनी आधीच माघार


चिंचवडच्या जागेवरून काही दिवसांपुर्वी मतभेदाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अश्विनी जगताप यांनी आधीच माघार घेत असल्याची घोषणा केली होती. यासंबंधी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची दोन दिवसांपूर्वी त्यांनी भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता त्या त्यांचे दिर शंकर जगताप यांच्या विजयासाठी निवडणुकीच्या मैदानत दिसणार आहेत. याआधी त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा आल्या होत्या तेव्हा त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना पक्षातील नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल त्याचबरोबर ज्याला उमेदवारी मिळेल त्यांच्यासाठी काम करू असंही त्यांनी म्हटलं होतं.