रायगड : आपण चौथ्यांदा निवडून येणार आणि मंत्री होणार असा विश्वास शिंदे गटाचे आमदार आणि महाड विधानसभेचे उमेदवार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. कधी एकदा 20 तारीख येतेय आणि लाडक्या आमदाराला आपण निवडून देतोय ही उत्सुकता लोकांना लागल्याचंही ते म्हणाले. आमचं मिशन फक्त 20 तारीख आणि  23 तारखेचा गुलाल उधळणं आहे असं भरत गोगावले म्हणाले.


भरत गोगावले म्हणाले की, लोकसभेला जसं वातावरण होतं तसं वातावरण आता नाही. या निवडणुकीत भरत शेठ चौथ्यांदा निवडून आल्यानंतर मंत्री असणार आहे. मला जनतेतून चांगला प्रतिसाद आहे. माझ्या मतदारसंघात विकासकामे झाली आहेत. जनतेला जे हवंय ते आम्ही शासनाच्या मार्फत दिलं आहे.  देशात आणि राज्यात आमचे महायुतीच सरकार आहे त्यामुळे कोणालाही काही अडचणी येणार नाहीत. 


रायगडमधील सातही जागा निवडून येतील


खारघर येथील पंतप्रधान यांच्या सभेचा की म्हसळा येथील शरद पवारांच्या सभेचा इफेक्ट होतो असा प्रश्न विचारल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, शरद पवारांच्या सभेचा महायुतीला अजिबात फटका बसणार नाही. जिल्ह्यातील महायुतीच्या सातही जागा निवडून येतील. रायगडसह कोकणातील देखील महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील.  


उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या व्हिडीओवर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. आपल्याकडे जर काही नसले तर घाबरायचं कारण काय? असा सवाल विचारत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. 


भरत गोगावलेंच्या विरोधात स्नेहल जगताप


2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले यांनी बाजी मारली. भरत गोगावले यांनी काँग्रेसचे माणिक मोतीराम जगताप यांचा पराभव करत विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत भरत गोगावले यांच्याविरोधात ठाकरे गटाने स्नेहल जगताप यांना उमेदवारी दिली आहे. 


मंत्रिपदाने भरत गोगावलेंना हुलकावणी


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना साथ दिली. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचे नाव जवळपास निश्चित होतं. पण काही कारणामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता आली नव्हती. पुढच्या विस्तारात त्यांना संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता. पण त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजित पवारांच्या मंत्र्यांनी शपथ घेतली आणि भरत गोगावलेंना मंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली. मात्र निवडणुकीच्या आधी महिनाभर भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. 


ही बातमी वाचा: