Beed News Latest Updates : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) संदर्भातील उमेदवारीवरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता पुन्हा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजप विधान परिषदेची उमेदवारी देणार का याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपातील दोन बडे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीत युद्धामध्ये कुणाची सरशी  होणार याची कार्यकर्त्यामध्ये सुद्धा जोरदार चर्चा सुरू झालीय. 
 
विधान परिषदेच्या उमेदवारी वरून या दोन्ही नेत्यांची ही वक्तव्यं पाहता वरवर जरी सहज वाटत असले तरी हे राजकारण वाटते तितके नक्कीच सरळ नाही. कारण यापूर्वी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांनी भाजपकडून सगळी तयारी केली होती. मात्र ऐनवेळी पक्षानं पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारली आणि रमेश कराड यांना उमेदवारी दिली. 
 
विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे नाराज झाल्या. त्यांनी आपली नाराजी जाहीर व्यासपीठावरून बोलून दाखवली. त्यानंतरही पक्षात सगळे आलबेल आहे, असं देवेंद्र फडणवीस सांगत राहिले. मात्र मागच्या अनेक दिवसात अभावानेच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे एका व्यासपीठावर पाहायला मिळाले. 


यानंतर पंकजा मुंडे यांची वर्णी मध्यप्रदेशच्या प्रभारी पदी लागली.  त्यामुळे महाराष्ट्राऐवजी पंकजा मुंडे या मध्यप्रदेश आणि दिल्लीच्या राजकारणात रमत गेल्या.  राज्य भाजपाच्या कुठल्यातरी एखाद्या कार्यक्रमात त्या जरी दिसल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातील अंतर काही केल्या कमी होत नव्हते. 


भाजपातील या दोन बड्या नेत्यांनी संघर्ष इतका टोकाला पोहोचला होता की यापूर्वी उमेदवारी जाहीर करून सुद्धा पंकजा मुंडे यांना आमदार करण्यात आलं नाही. त्यानंतर केंद्रातील मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळेल अशी जोरदार चर्चा होती, मात्र प्रीतम मुंडे यांना मंत्री न करता भागवत कराड यांना मंत्रिपद देऊन फडणवीस आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे शह दिला दिला होता हे विसरून चालणार नाही.
 
दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक


राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या 20 तारखेला निवडणूक होणार आहे. 2 जूनला अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर 9 जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते.