Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवारांच्या (Sharad Pawar) बीड (Beed) जिल्ह्यातील सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांची होणारी सभा रद्द होणार, अशा चर्चा होत्या. पण मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची (Ajit Pawar) सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत अजित पवार यांची बीडमध्ये 27 ऑगस्ट रोजी उत्तर सभा होणार असल्याची माहिती दिली आहे. बीडमधील सभेमध्ये शरद पवारांनी धनंजय मुंडे आणि अमरसिंह मुंडे या अजित पवरांच्या गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली होती. 27 तारखेला होणाऱ्या उत्तर सभेतून धनजंय मुंडे अथवा अजित पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

धनंजय मुंडे यांनी काय केले ट्वीट - 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत, ही विनंती, असे ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलेय. 

जिल्हाध्यक्ष काय म्हणाले ?

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देणारी उत्तर सभा ही बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड वरती येत्या 27 तारखेला होणार आहे.. ही सभा होणार नसल्याची चर्चा सकाळपासून सुरू आहे. मात्र या संदर्भामध्ये धनंजय मुंडे यांनी सभा होणारच अशी भूमिका जाहीर केल्यानंतर बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सुद्धा बीडमध्ये नियोजित सभा होणारच असल्याचे सांगितले आहे. बीडमध्ये होणाऱ्या या सभेला मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नऊ मंत्री येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी 27 तारखेला सभा होणार आहे, अशी माहिती दिली आहे.

पवारांच्या सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप? दरम्यान. 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर, काही महिला पैसे वाटप करत असल्याचे देखील तथाकथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पवारांच्या सभेला महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर अजून तरी दोन्ही गटाची अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही.