बारामती : आमचे गुरु गिरीश बापट, तर महागुरु नरेंद्र मोदी आहेत. मोदींच्या शाळेत मी शिकलेले असल्यामुळे विद्यार्थी कच्चा कसा राहील? असा सवाल करत बारामतीतील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पहिल्याच सभेत टाळ्या मिळवल्या. पवारांच्या बालेकिल्ल्यात खासदार सुप्रिया सुळेंविरोधात रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने तिकीट दिलं आहे.


आपल्या तीन मिनिटांच्या भाषणात कांचन कुल यांनी सुरुवातीची दोन मिनिटं वाचून दाखवलं. 'तुम्हाला वाटेल हा उमेदवार नवीन आहे. त्यांना कामाची काही माहिती नाही. पण एक लक्षात ठेवा, आमचे गुरु गिरीश बापट साहेब आहेत, तर महागुरु नरेंद्र मोदी आहेत. याच मोदींच्या शाळेत मी शिकले आहे, मग विद्यार्थी कच्चा राहील कसा?' असा सवाल शेवटच्या मिनिटाला न वाचता कांचन कुल यांनी केला.



बारामतीत भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात शिवसेनेच्या प्रवक्त्या, आमदार नीलम गोऱ्हे यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. मंत्री विजय शिवतारेंनी केलेल्या 'सुप्रिया सुळे नुसत्या सेल्फी काढतात' या टीकेचा धागा पकडत 'कांचनताई दिल्लीमें, सेल्फीवाली बाई गल्लीमें' अशी मिश्कील टीका केली. बारामतीतील एक व्यक्ती रागावली की स्वतःच्या घरातील टीव्ही फोडते, हे नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य नेमकं कोणाला उद्देशून होतं, यावरुन बारामतीत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या :

बारामतीत भाजपच्या तिकीटावर रासप आमदाराची पत्नी, सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल