बारामती: लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर बारामती (Baramati) पवार विरुद्ध पवार याचा पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे. बारामतीत (Baramati) पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढण्यासाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.


लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना (Ajit Pawar) धूळ चारल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला धूळ चारली त्यानंतर आता दोन्ही पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार दौरे करताना दिसत आहेत.


स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा दौरा - जय पवार


अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कडून जय पवार हे बारामती तालुक्याचा दौरा करीत आहेत. या दौऱ्यामध्ये आभार दौरा जरी नाव असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आहे. तर आगामी काळात नवीन चेहऱ्यांना संधी देऊ असं जय पवार म्हणतात.


जास्तीत जास्त पक्ष बांधणीची गरज -युगेंद्र पवार


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणीवर भर दिला जातोय.. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना भरघोस यश मिळाल्यानंतर शरद पवारांकडून युगेंद्र पवार बारामती तालुक्यात दौरा केला.. त्यामुळे विधानसभेचा विचार करता जास्तीत जास्त पक्ष बांधणीची गरज ही शरद पवारांच्या पक्षाला आहे.


अजित पवारांना मिळालेल्या यशानंतर बारामतीत अजित पवारांचा 22 तारखेला नागरी सत्कार करण्यात येणार आहे. एक प्रकारे या नागरी सत्कारात अजित पवार बारामती शक्ती प्रदर्शन करणार आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत नंतर  दोन्ही पवार कुटुंबाच बारामतीतलं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढचा अध्याय पाहायला मिळणार यामध्ये काही शंका नाही. 


लोकसभेला शरद पवार तर विधानसभेला अजित पवार ठरले वरचढ


लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरली. बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी झाल्या. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये अजित पवारांनी पराभवाचा सर्व वचपा काढला. जितक्या मतांनी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. तितक्याच जास्त मतांनी अजित पवारांनी विक्रमी मतं मिळवलं. विधानसभेला शरद पवारांचे उमेदवार युगेंद्र पवारांचा पराभव झाला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पवार विरूध्द पवार अशी लढत दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे.