पुणे: राज्यभरात काल 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. मतदान पार पडल्यानंतर काही वेळातच अनेक एक्झिट पोल्स समोर आले. या पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, काही मतदारसंघांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेमध्ये देखील पवार विरुद्ध पवार अशी लढत झालेला बारामती (Baramati) मतदारसंघ सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच बारामती बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसचे उमेदवार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांनी बारामती मतदारसंघाबाबत आणि अजित पवारांच्या (AjitPawar) विजयाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे, ते सध्या ते चांगलंच चर्चेत आलं आहे. 


एबीपी माझाशी बोलताना उत्तम जानकर(Uttamrao Jankar) यांनी 'अजित पवार (Ajit Pawar) चाळीस हजार मतांनी पडणार' असल्याचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार यांचा बारामती मध्ये चाळीस हजार पेक्षा जास्त मताने पराभव होईल असा ठाम दावा यावेळी उत्तम जानकर यांनी केला आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) मत म्हणजे भाजपाला मत अजित पवारांना (Ajit Pawar) मत म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना मत त्यामुळे बारामतीत आता विजय आता सोपा राहिलेला नाही. राज्याचा नेतृत्व केलेला तो तालुका आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 180 ते 200 जागा नक्की निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय त्याचबरोबर योगेंद्र पवार 40 हजार पेक्षाही अधिक मताधिक्यांनी निवडून येणार असा विश्वास देखील उत्तम जानकर यांनी व्यक्त केला आहे. 



लाख भर मताने अजित पवार निवडून येतील - प्रफुल पटेल 


'आम्ही महाराष्ट्रामध्ये 175 जागा घेऊन महायुतीचा सरकार बनवणार असल्याचा ठाम विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्या लढाईबद्दल बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवारांपासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत सर्वांची माझ्या संबंध चांगले राहिलेले आहेत, मी त्यांचा एक फॅमिली मेंबर आहे, या निवडणुकीमध्ये आमचे नेते अजित पवार शंभर टक्के भरघोस मताने निवडून येतील, काही कोणाला चिंता करायचा कारण नाही, उगाचच चर्चांना उधाण आलं आहे. दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल. किमान लाख भर मताने अजित पवार निवडून येतील असा विश्वास मला आहे', असं प्रफुल पटेल यांनी म्हटले.



अजितदादा की युगेंद्र पवार, जाणून घ्या कोणाची सत्ता येणार?


'एबीपी माझाशी' बोलताना बारामतीतील पत्रकार म्हणाले, शरद पवारांची सांगता सभा लक्षात घेतल्यास आपल्याला हे दिसून येईल की शरद पवारांनी बारामतीतील मतदारांना युगेंद्र पवार यांना संधी देण्याचं आवाहन केलं होतं. युगेंद्र पवार देखील बारामतीचा चांगला विकास करू शकतील त्याचबरोबर ते उच्चशिक्षित आहेत. तरुण आहेत. संपूर्ण गोष्टीची त्याला जाण आहे. शेती विषयी कारखानदारी याबद्दलची त्यांना माहिती आहे. त्यांना तुम्ही संधी द्या आतापर्यंत तुम्ही मला तीस पर्यंत तीस वर्ष संधी दिली. त्यानंतर अजित पवारांना संधी दिली. आता योगेंद्र पवारांना पुढच्या काळात तुम्ही संधी द्यायला हवी.


शरद पवारांच्या या आवाहनानंतर उलट अजित पवारांनी आपल्या सांगता सभेमध्ये मी विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आलेलो आहे. मी विकास पुरुष आहे. मी काम करतो पुढच्या काळात देखील मी विकासावर भर देईल. त्यामुळे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा असं अजित पवारांनी आवाहन केलं होतं. त्यामुळे दोघं विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहेत. वास्तविक शरद पवारांचे आणि अजित पवारांचे विचार जरी वेगळे असले तरी शरद पवारांना मानणारा गट आणि अजित पवारांना मानणारा गट हा बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. आता हा नेमका तरुण आणि वयस्कर वयोगटातला मतदार कोणत्या उमेदवाराला संधी देईल हे सांगणं आता थोडं कठीण असलं तरी शहरांमध्ये अजित पवारांचा माप थोडं झुकतं आहे, असं दिसून येते मात्र ग्रामीण भागामध्ये युगेंद्र पवारांनी बाजी मारल्याचं दिसत आहे.