Andheri East Bypoll 2022 : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ट्विस्ट अॅण्ड टर्न्सची मालिका सुरु आहे. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा अजूनही मंजूर झाल्याने ठाकरे गटासमोरील पेच वाढलेला असतानाच आता ही निवडणूक शिंदे गट (Shinde Group) लढवू शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अंधरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची दाट शक्यता आहे. भाजप-शिंदे गट युतीमध्ये अंधेरी पूर्व मतदारसंघाची जागा बाळासाहेबांची शिवसेनेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पहिला संघर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही ठाकरे आणि शिंदे गटातच लढली जाईल. निवडणूक आयोगाकडून नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपने दाखवलेला दावा सोडल्यात जमा आहे.


भाजपकडून मुरजी पटेल हे या निवडणुकीसाठी तयारी करत होते. आता शिंदे गटाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली जाते की आणखी कोणाला संधी मिळते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे ऋतुजा लटके यांना देखील आपल्याकडून उमेदवारी देण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरु आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी एकापाठोपाठ एक घडामोडी घडत आहेत. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे. त्याआधी शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. 


कोण आहेत मुरजी पटेल?
- मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक आहेत.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुरजी पटेल हे रमेश लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. 
- राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप युती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. 
- त्यामुळे मुरजी पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. 
- पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल हे भाजपचे दावेदार उमेदवार समजले जात होते. परंतु आता त्यांनी माघार घेतल्याची चर्चा आहे


ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्याने शिवसेना कोर्टात दाद मागणार
दुसरीकडे अंधेरी पोटनिवडणूक रंगात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न केल्यामुळे आता शिवसेना कोर्टात जाणार आहे. शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांच्यावर दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 14 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना, मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यामुळे ठाकरे गट आता कोर्टात दाद मागणार आहे.