अहमदनगर : सुजय विखेंच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबतची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हणत बाळासाहेब थोरात आक्रमक झाले आहेत.

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरातांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीच थोरातांनी केली आहे. विखे कुटुंबाला काँग्रेसनं खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षानं पूर्ण केल्या असंही थोरात म्हणाले.

थोरात म्हणाले की, सुजय विखेंचा निर्णय वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिलं, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिलं आहे, असे थोरात म्हणाले. विखेंच्या सर्वच अपेक्षा पक्षांनं पूर्ण केल्या असताना हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरणार नाही याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

VIDEO | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा


मी कमिटीचा सदस्य नाही. त्यामुळे मी जागेचा आग्रह करणे योग्य नाही. राष्ट्रवादीने जागा द्यावी की नाही हे त्यांचा निर्णय आहे, असेही ते म्हणाले. राज्यात महत्वाची जबाबदारी असणारे नेतृत्व विखे पाटलांकडे आहे. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, याचीही आठवण त्यांनी करुन दिली.

आता ते विरोधी पक्ष नेतेपदी राहणार असतील तर त्यांनी बैठक घेणं गरजेचं आहे. स्क्रीनिंग कमिटीत असताना आता आपण नेतृत्व दाखविण्याची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला. जर ते विरोधी पक्षनेतेपद सोडणार नसतील तर जनतेच्या समोर येऊन भूमिका मांडण गरजेचं आहे, असेही थोरात यावेळी म्हणाले. त्यांच्याबाबत अविश्वासाचं वातावरण असल्याची टीकाही बाळासाहेब थोरात यांनी केली.

VIDEO | सुजय विखे 'मातोश्री'वर | मुंबई | एबीपी माझा