मुंबई : एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुंबई-ठाण्यातील सभेमुळं राजकीय वातावरण तापलं असताना आता दुसरीकडे मनसेचे निष्ठावंत बाळा नांदगावकरांनीही कार्यकर्त्यांना भावनिक साद दिली आहे. दोन भावांना एकत्र आणण्याचा बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झाला आहे, आता मराठीच्या अस्मितासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र उभे राहण्याची गरज आहे असं आवाहन बाळा नांदगावकरांनी केलं.
बाळा नांदगावकरांनी कार्यकर्त्यांना आणि मराठी माणसांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, ही आपल्या अस्मितेची, आपल्या भविष्यातील मुंबईची आणि मराठी माणसाच्या हक्काची आहे. घराघरात जा, गल्लोगल्ली फिरा, माणसामाणसांत विश्वास जागवा असं आवाहन त्यांनी केलंय.
Bala Nandgaonkar Facebook Post : बाळा नांदगावकरांचं पत्र जशास तसं
सविनय जय महाराष्ट्र !
मी आपलाच बाळा
तुमच्यातीलच एक. काल शिवसैनिक, आज महाराष्ट्र सैनिक आणि कायम ठाकरेंचा निष्ठावंत 'बाळा'.
पक्ष वेगळे असू शकतात, पण रक्तातला रंग एकच, मराठी. हृदयातली ज्वाळा एकच, महाराष्ट्र धर्म आणि श्रद्धेचं केंद्र एकच, माननीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे.
लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना साहेबांनी मला सांगितलेले शब्द आजही मला स्पष्ट आठवतात. बाळा, ह्या दोन भावांना एकत्र आण. हे एक झाले पाहिजेत. त्या क्षणी दिलेला शब्द आजही माझ्या काळजात कोरलेला आहे. मी साहेबांना म्हटलं होतं, साहेब, मी प्रयत्न करेन.
आज अभिमानाने सांगतो. नियतीने, मराठी माणसाच्या इच्छेने आणि शिवसैनिक महाराष्ट्र सैनिकांच्या ताकदीने साहेबांना दिलेला तो शब्द पूर्णत्वास गेला आहे. आज ठाकरे बंधू महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि मुंबई वाचवण्यासाठी एकत्र उभे आहेत. ही फक्त राजकीय युती नाही, ही मराठी अस्मितेची गर्जना आहे. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या अभेद्य युतीचे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २२७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
मतदान यंत्रावर (EVM) जिथे रेल्वे इंजिन निशाणी असेल तिथे त्यासमोरील बटण दाबून युतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्या.
तर तुमच्या मतदान यंत्रावर (EVM) जिथे मशाल आणि तुतारी ही निवडणूक निशाणी दिसेल तिथे युतीच्या उमेदवाराला निवडून द्या.
इतर प्रभागांतील सैनिकांनो ही तुमचीही जबाबदारी आहे.
ही लढाई मराठी माणसाच्या संघर्षाची, स्वाभिमानाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई मुंबई वाचवण्यासाठी आहे.
चला - माननीय शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न साकार करूया !
माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांचे आणि समस्त हिंदू समाजाचे हृदयसम्राट. गर्व से कहो हम हिंदू है अशी गर्जना करणारे मा. बाळासाहेब आमचे हृदय आहेत. सन्माननीय उद्धवजी आणि राजजी हे बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत, तर निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि कडवट शिवसैनिक हा त्यांचा तिसरा नेत्र आहे. तो नेत्र उघडला की ज्वाळा निघतात, मशाल पेटते आणि ती मशाल आज इंजिनातलं इंधन पेटवून महापालिकेकडे तुतारी फुंकत सुसाट धावत आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात चमत्कार घडवू शकणारे सन्माननीय श्री. शरद पवार साहेब देखील आपल्या सोबत आहेत. थोडक्यात विकासाचं परिपूर्ण समीकरण जमलं आहे.
म्हणूनच हात जोडून विनंती करतो, मराठी माणसा जागा हो ! रात्र वैऱ्याची आहे ! मुंबई आपली आहे. मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक जाती-धर्माचा माणूस आपलाच आहे. मी महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र माझा आहे. मुंबई माझी आहे. मी मुंबईचा आहे.
मी मनसेचा नेता म्हणून नाही, तर तुमचा आपला बाळा म्हणून सांगतो. ही निवडणूक फक्त उमेदवारांची नाही, ही आपल्या अस्मितेची, आपल्या भविष्यातील मुंबईची आणि मराठी माणसाच्या हक्काची आहे. घराघरात जा, गल्लोगल्ली फिरा, माणसामाणसांत विश्वास जागवा. मत द्या मतदार घडवा आणि युतीचे उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी करा.
ही फक्त विनंती नाही. ही महाराष्ट्र धर्मासाठीची हाक आहे.
जय महाराष्ट्र !
ही बातमी वाचा: