परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज पहिल्याच दिवशी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  त्यामुळे महाविकास आघाडीत जागेवरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडत शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.  


मागील अनेक दिवसांपासून सुरेश वरपूडकर काँग्रेसचे विद्यमान आमदार हे प्रचार करत आहेत. दुसरीकडे बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून पाथरी विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मीच निवडणूक लढवणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत.


बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून अर्ज दाखल 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पाथरी विधानसभा मतदार संघात पहिला अर्ज बाबाजाणी दुर्राणी यांनी दाखल केला आहे. पाथरीत विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाचे असल्यानं या जागेवरुन महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 


बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट


पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी 20 ऑक्टोबरला बाबाजानी दुर्राणी यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती.  


पाथरी विधानसभा मतदार संघावर महाविकास आघाडीत बिघाडी होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी काही दिवसांपूर्वी प्रचार देखील सुरु केला होता.  बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. 


पाथरीची जागा काँग्रेसची, सुरेश वरपूडकर यांचा दावा


पाथरीचे विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांनी काल बाबाजानी दुर्राणी यांच्यावर टीका केली होती. बाबाजानी दुर्राणी आता महाविकास आघाडीत आलेत त्यामुळेच इकडे तिकडे करत असल्याचा टोला  लगावला होता. पाथरी विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या पदाधिकऱ्यांचा मेळावा परभणीत घेण्यात आला होता, त्यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मेळाव्यानंतर बोलताना पाथरीची जागा काँग्रेसची आहे, इथली महाविकास आघाडी एकसंघ आहे. बाबाजानी दुर्राणी आता महाविकास आघाडीत आलेत त्यामुळेच ते इकडे तिकडे करत असल्याचे सुरेश वरपूडकर म्हणाले आहेत. 


इतर बातम्या : 


मोठी बातमी : भाजपचा बडा नेता, माजी मंत्री राष्ट्रवादीत; विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली