मुंबई :  येणाऱ्या विधानसभेची निवडणूक देखील ईव्हीएम मशीनवर होणार असून बॅलेट पेपर वापरण्यासंदर्भात ज्या राजकीय पक्षांनी मागणी केलेली आहे, ती पूर्ण होणार नाही. कारण बॅलेट पेपर आता इतिहास जमा होताहेत, असं मत देशाचे मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.


दरम्यान, दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घ्या, अशी विनंती काही राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला केली आहे. महाराष्ट्र निवडणूक आयोगानं घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर ही माहिती समोर आली आहे. आता निवडणूक आयोग त्याची किती गंभीर दखल घेतं हे पहावं लागणार आहे.

सुनील अरोरा म्हणाले, देशात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात शासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. प्रशासनातील पोलीस, जिल्हाधिकारी, केंद्रीय संस्था, यांच्यासोबत बैठक झाल्या आहेत. निवडणूक कालावधीमध्ये सुरक्षा यंत्रणा म्हणून तेलंगणा, आंध्र, तामिळनाडू आदी राज्यातील पोलीस यंत्रणा मागवली जाणार आहे. महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील. काही राजकीय पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मला भेटले होते. त्यांनी बोगस मतदारांबद्दल तक्रारी केल्या आहेत, त्याची दखल घेऊन त्यावर काम सुरू आहे, असे अरोरा म्हणाले.

अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीन संदर्भात तक्रारी दाखल केलेल्या आहेत. मात्र येणारी निवडणूक ही ईव्हीएम मशीनवरच घेतली जाणार आहे. बॅलेट पेपर आता आपल्या देशात इतिहासजमा होत आहेत. ईव्हीएम मशीनमध्ये जे-जे नवनवीन बदल आहेत ते स्वीकारून चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडतील असे प्रयत्न आमच्या आहेत, असेही  अरोरा यांनी सांगितलं.

अरोरा म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा तितकीच राहणार आहे, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे ते सर्व पोलिंग सेंटर यापूर्वी पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असायची. वरिष्ठ मतदारांनी या संदर्भात तक्रारी केल्यामुळे आता यापुढील पोलिंग सेंटर  हे तळमजल्यावर हलवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अरोरा यांनी सांगितलं.