पुणे : विधानसभा निवडणुकीतील सर्वच पक्षाचे उमेदवार ठरले असल्याने खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रचार आता सुरु झाला आहे. भाजपचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात 9 तर गृहमंत्री अमित शाह 18 सभा घेणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा कुठे होणार याची उत्सुकता भाजपच्या कार्यकर्त्यांना आहे. मोदी नऊ पैकी दोन सभा पश्चिम महाराष्ट्रात घेणार आहे. यामध्ये एक सभा सातारा आणि दुसरी पुण्यात होईल. दोन्ही सभा एकाच दिवशी होतील, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी दिली.



येत्या 17 ऑक्टोबरला सातारा आणि पुण्यातील सभा पार पडणार आहे. मात्र पुण्यातील सभेचं ठिकाण अजून ठरलेलं नाही. हरियाणामध्ये निवडणुका असल्याने पुण्यातील सभेची तारीख सतत बदलत असल्याने ठिकाण ठरत नव्हतं. मात्र आता तारीख ठरल्याने ठिकाणही लवकरच ठरवू, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


तर राज्यातील इतर ठिकाणच्या सभांचंही नियोजन सुरु असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं. पुण्यात एकच सभा होत असल्याने पुण्यातील सर्व मतदारसंघातील उमेदवारांसाठी ही सभा असेल, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.