मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाच राज्यांमध्ये झालेल्या भाजपच्या पिछाडीनंतर केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. आजचा निकाल म्हणजे जनतेनं भाजपला दिलेली चपराक आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.
राज ठाकरे यांनी पाच राज्यातील जनतेचं अभिनंदन केलं. प्रथम त्यांनी गुजराती जनतेचे आभार मानले. कारण गुजराजच्या जनतेने भाजपला विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा जागा दाखवली होती, असं राज ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींना विरोधक पप्पू म्हणायचे, मात्र राहुल गांधी आज परमपूज्य झाले आहे. देशातील जनतेला राम मंदिराची नाही, तर राम राज्याची गरज आहे. सरकारने गेल्या साडेचार वर्षात काहीही काम न केल्याने जनतेला दाखवण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. त्यामुळे भावनेचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.
आजचा निकाल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीची नांदी आहे. भाजपवर ही वेळ येणारच होती. भाजपच्या जुलमी राजवटला ही चपराक आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
भाजपला मोठा धक्का
भाजपच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड खेचून आणण्यात काँग्रेसला यश आलं आहे, तर मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर आहे. तेलंगणात मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे, तर मिझोरम मात्र काँग्रेसच्या हातून निसटलं. मिझोरम नॅशनल फ्रन्ट मिझोरममध्ये सत्तास्थापन करत आहे.
लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्याच्या वर्षपूर्तीलाच त्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना काँग्रेसने मोठा हादरा दिला. सतत पाच वर्षांनी सत्तापालटाचा राजस्थानचा ट्रेण्ड कायम राहिला आहे. राजस्थानमध्ये भाजपने कडवी झुंज दिली असली, तरी काँग्रेसला बहुमत मिळालं आहे.
छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांचं सरकार काँग्रेसने केवळ खालसाच केलं नाही, तर भाजपचा सुपडासाफ झाला. मध्य प्रदेशात मात्र भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये कांटे की टक्कर रंगली.
तेलंगणामध्ये टीएसआरच्या के चंद्रशेखर राव यांना आपला गड राखण्यात यश आलं आहे. मिझोरममध्ये सत्तापालट झाले असून तीन मोठ्या राज्यात मोठी आघाडी मिळवणाऱ्या काँग्रेसने आपल्या हातून मिझोरमची सत्ता गमावली आहे. मिझोरम नॅशनल फ्रन्टने मिझोरममध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
संबंधित बातम्या
Election Results Live Updates: राजस्थान CM पदासाठी गहलोत चर्चेत
भाजप खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर