पुणे : राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जागावाटपावरुन शिवसेनेवर निशाणा साधाला आहे. बुधवारी पुण्यात मनसेच्या पहिली सभा पावसामुळे रद्द झाली होती, त्यामुळे आज पुण्यातील कसबा पेठेत सभा पार पडली. शिवसेनेच्या वाट्याला पुण्यात एकही जागा आलेली नाही, यावरुन राज ठाकरेंनी शिवसेनेवर टीका केली.


पुण्यात भाजपने शिवसेनेला शिल्लक ठेवलं नाही. नाशिक, पुण्यासारख्या मोठ्या शहरात शिवसेनेला युतीत एक जागा मिळत नाही? कुठून येते ही हतबलता, असा सवाल राज ठाकरेंनी शिवसेनेला विचारला. तर बाळासाहेब असते तर ही वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेसाठी नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महत्वाच्या शहरांमध्ये एकही जागा सोडलेली नाही.




सरकारने देशभरात स्मार्टसिटी तयार करण्याची घोषणा केली होती. त्या योजनेचं काय झालं? पुणे शहरात भरलेलं पाणी, वाहतूक कोंडी आणि खड्डे पडलेले रस्ते म्हणजे स्मार्ट सिटी? असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला. बहुमताचं सरकार कुणालाही न जुमानता निर्णय घेत असतं. हे का होतं? कारण त्यांच्यासमोर तगडा विरोधी पक्ष नसतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं.


कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आले


भाजपचे कोथरुडचे उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. महाराष्ट्रातील सागंली, सातारा, कोल्हापुरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्ताधारी निवडणुकांच्या प्रचारात मग्न होते. त्यादरम्यान कोल्हापूरचे एक मंत्रीच पुण्यात वाहत आले, असा टोला राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना उद्देशून लगावला.