शिर्डी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. तर काँग्रेसने (Congress) या निवडणुकीत 101 जागा लढवल्या होत्या. मात्र 16 जागांवरच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. यावरून राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आकडेवारी मांडत काँग्रेसच्या पराभवाचा इतिहासच सांगितला आहे. तसेच सध्याच्या राजकीय घडामोडींवर देखील अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. 


शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधताना अशोक चव्हाण म्हणाले की, मुख्यमंत्री ठरण्यात काही अडचणी नाहीत. मी त्या प्रकियेत नाही. मात्र, तीनही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा आणि समन्वय झालाय. बराचसा विषय मार्गी लागलाय, फक्त औपचारिकता बाकी आहे. माझी पसंती पक्ष जो निर्णय घेईल त्यासोबत राहील. 


अशोक चव्हाणांचा काँग्रेसवर निशाणा


विधानसभा निवडणूक काँग्रेसला मोठा धक्का बसला. याबाबत अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आत्मपरिक्षण करावे. एवढी दयनीय परिस्थिती का झाली? मी राज्याचा प्रमुख असताना 82 जागा निवडून आल्या, पृथ्वीराज बाबा आले आणि 82 च्या 42 केल्या. आता नाना पटोलेंनी 42 वरून 16 वर आणलंय. या परिस्थितीचे आकलन त्यांनी करायला हवे. मी काही सल्ला द्यायला बसलेलो नाही. ते मोठी माणसं आहे. जाणकार माणसे त्या पक्षात असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.


मला वैयक्तिक आकस नाही


अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय. याबाबत देखील त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. मी मनुष्य आहे, मलाही भावना आहेत. ज्या पद्धतीने मी 14 वर्ष वनवास भोगला. त्यामुळे मला भावना व्यक्त कराव्या लागल्या. पण मला वैयक्तिक आकस नाही. मी साईबाबांचा भक्त असल्याने विनाकारण कोणावर टिका करावी हा माझा हेतू नाही. रागाच्या भरात मी काही बोललो असेल तर त्याच त्यांनी मनावर घेऊ नये. राजकारणात हार-जीत होत राहते. प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले. 


शिंदेंच्या नाराजीवर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया


महायुतीत मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याने सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, मला नाही वाटत ते नाराज असतील. तीन पक्ष आहेत, त्यामुळे नाराजीच काही कारण नाही. दोन-अडीच वर्ष मुख्यमंत्री होणे आणि त्यानंतर पायउतार होणे त्यामुळे वाटलं असेल. मात्र शिंदे यांनी मोठ्या मनाने निर्णय घेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे म्हटले आहे.  


राऊतांनी चिंता करू नये


अजित पवार कायम उपमुख्यमंत्रीच राहणार, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊतांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या‌ ज्या जागा कमी झाल्या त्याबद्दल भाष्य करावे. महायुतीमध्ये कोणाला किती जागा? कोण मुख्यमंत्री? कोण उपमुख्यमंत्री होणार? याची राऊतांनी फारशी ‌चिंता करू नये. प्रवक्ता म्हणून काहीतरी बोलावे लागते म्हणून ते बोलले असावेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 


आणखी वाचा 


Devendra Fadnavis : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, प्रतिज्ञा खरी ठरणार, फडणवीस 31 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार!