पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींची स्ट्रॅटेजी ठरली असून शक्य त्या ठिकाणी घडाळ्यावर आणि शक्य त्या ठिकाणी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. इंदापुरातही तसाच निर्णय घेण्यात आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) या घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार आहेत. 

Continues below advertisement

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे या बुधवारी घड्याळाच्या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. दोन राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अंकिता पाटील या इंदापूर तालुक्यातील बावडा जिल्हा परिषद गटामधून लढणार आहेत. त्यासाठी त्या घड्याळाच्या चिन्हावरती आपली उमेदवारी दाखल करणार आहेत.

दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र पंचायत समितीच्या रिंगणात 

इंदापूर पंचायत समिती निवडणुकीमध्ये राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या मुलाला म्हणजेच श्रीराज भरणे यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार आहेत. भरणे यांचे पुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे हे बुधवारी बोरी पंचायत समिती गणासाठी आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. श्रीराज भरणे यांच्या एन्ट्रीमुळे भरणे कुटुंबातील दुसरी पिढी आता राजकारणात सक्रिय होणार आहे.

Continues below advertisement

शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार आहेत. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Alliance) नेत्यांनी एकत्र बैठक करुन ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधे देखील घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. 

एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील चिन्हाची लढाई सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली असताना दुसरीकडे दोन पक्षांमधील अंडरस्टँडिंग देखील निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र आहे. त्यामुळं न्यायलयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील एकोप्याने लढवण्याचा निर्णय घेतलाय. 

महापालिका निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली. तरीही भाजपच्या आव्हानाचा दोन्ही पक्ष सामना करू शकले नाहीत. दोन्ही ठिकाणी झालेल्या दारुण पराभवाने दोन्ही पक्षातील नेत्यांना आणखीन जवळ आणल्याचं चित्र आहे. मात्र, अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबद्दल वेगळा सूर आळवत असल्याचं बोललं जातंय. 

ही बातमी वाचा: