Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून मुरजी पटेल यांना संधी मिळाली आहे. मात्र मुरजी पटेल (Murji Patel) यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी जाहीर करावी लागली. कारण या जागेवर लढण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा गट आग्रही होता. आता या जागेवर भाजपच्या मुरजी पटेल यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचं आव्हान आहे.


पडद्यामागे नेमकं काय घडलं?


अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचा उमेदवार कोण असणार याचा तिढा अगदी शेवटच्या क्षणी सुटला. भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मुरजी पटेल यांचे नाव घोषित करण्यात आलं. शक्तिप्रदर्शन करत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.


अंधेरी पूर्वची जागा शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेनेकडे होती. त्यामुळे या जागेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार असावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत ऋतुजा लटके यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न केला परंतु ही खेळी यशस्वी झाली नाही, अशी चर्चा आहे. 


मुरजी पटेल यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचाही विचार झाला पण त्यासाठी भाजप तयार नव्हती. भाजपचे नेते आशिष शेलार 13 ऑक्टोबरला रात्री उशिरा वर्षा या निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि मुरजी पटेल भाजपकडून लढल्यावरच जिंकू शकतील हे त्यांना पटवून सांगितलं. त्यांनतर पटेल भाजपकडूनच लढणार हे निश्चित झालं.


मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी का?


- भाजपचं चिन्ह घराघरात पोहोचलं आहे. त्या तुलनेत बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह घराघरात पोहोचलेलं नाही. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला


- अंधेरीमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी थेट लढाई झाली असती तर त्याचा फटका बसण्याची भीती होती.


- अंधेरी विधानसभा निवडणुकीत मराठी मतांसोबत उत्तर भारतीय आणि गुजराती मतांचा टक्का जास्त आहे, त्याचा भाजपला फायदा होण्याची आशा आहे 


- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधेरीची जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. पण एकनाथ शिंदे यांचं मुंबईमध्ये फारसं बळ नाही. शिवाय अंधेरीत शिंदे गटाकडे प्रबळ उमेदवारही नव्हता.


देवेंद्र फडणवीस आणि भाजपसमोर मोठं आव्हान
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट लढाई होणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मोठ्या प्रयत्नाने ही जागा भाजपच्या पदरात पाडून घेतली आहे. आता मुरजी पटेल यांना जिंकून आणण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर आहे.