Andheri East Bypoll Election 2022 : अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परंतु, ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यांच्यासमोर एक शासकीय अडचण निर्माण झाली आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या कर्मचारी होत्या. त्यांनी महिन्याभरापूर्वीच आपल्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. जोपर्यंत लटके यांचा राजीनामा अर्ज मंजूर होत नाही, तोवर त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ नेते पालिका आयुक्तांसह सामान्य प्रशासन विभागाच्या भेटीगाठी घेत आहेत. दरम्यान लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास ठाकरे गटापुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अंधेरी पूर्व येथून शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांनी विजय मिळवला होता. काही महिन्यांपूर्वी दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं रमेश लटके यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेतली जात आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यानं ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के/पूर्व कार्यालयात कार्यरत होत्या. त्यांनी साधारण महिन्याभरापूर्वी राजीनामा दिला आहे. पण त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. 


ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यानं ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लटके यांचा राजीनामा लवकर मंजूर करावा यासाठी शिवसेना नेते अनिल परब, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, अंधेरी पूर्व येथील निवडणुकीचं बिगुल वाजलं असून निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची पहिली निवडणूक असल्यानं ही निवडणूक ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सत्ता राखणार की, शिंदे गट (बाळासाहेबांची शिवसेना) आपलं अस्तित्व सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.