Amit Thackeray On Mahesh Sawant: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना राजकारण कळतं का?, ते बालिश आहे, काहीही बोलू शकतात, अशी टीका माहीममधील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांनी केली होती. यावर आता अमित ठाकरेंनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. 


मी काल प्रभादेवीच्या जाहीर सभेत केलेल्या भाषणात कोणावरही टीका केली नव्हती. मी माझं व्हिजन समोर मांडलं होतं. लोक ठरवतील मला अनुभव आहे की नाही. मी आहे बालिश...मग आता, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरेंनी दिली. तसेच मूळ मुद्दे लोकांकडून येतात. माझे व्हिजन असेल. माझ्या पिढीने किंवा मुलांनी जे अनुभवलं नाही ते देण्याचे काम करणार असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितले. पाण्याच्या प्रश्नासह इतर मुद्द्यांवर काम करणार असल्याची माहिती देखील अमित ठाकरेंनी दिली. 


महेश सावंत नेमकं काय म्हणाले होते?


राज ठाकरे आणि अमित ठाकरेंच्या सभेनंतर महेश सावंत यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली होती. अमित ठाकरेंना राजकारण कळत नाही. ते बालिश आहेत, असं विधान महेश सावंत यांनी केलं.  अमित ठाकरेंना भेटण्यासाठी कधीही अपॉईंटमेंट घेण्याची गरज लागणार नाही. तो कधीही भेटू शकतो, असं राज ठाकरे कालच्या जाहीर सभेत म्हणाले होते. यावर देखील महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरेंना वक्तव्य करायला स्वतंत्र आहे. जनता सुज्ञ आहे जनता ठरवेल, असंही महेश सावंत यांनी सांगितले. जनतेला कोण कधीही भेटू शकतो, हे माहीती आहे. आमची सभा बघा आणि त्यांची सभा बघा...यावरुन भाडोत्री माणसं कुठली आणि स्थानिक माणसं कुठली हे लोकांकडे बघूनच दिसेल, अशी टीकाही महेश सावंत यांनी केली. तसेच राज ठाकरेंना बोलण्याइतका मी मोठा नाहीय, असंही महेश सावंत यांनी सांगितले.


अमित ठाकरे सभेत काय म्हणाले?


कोळी बांधव मला भेटले आणि म्हणतात की मासे पकडायला गेले की, जाळ्यात कचरा लागतो, अजूनही कचऱ्याची समस्या आहे. इथले सहजरित्या सुटणारे विषय आहेत, मला तुम्ही एकदा संधी द्या, मी एका महिन्यात सर्व सोडवतो, असं आवाहन अमित ठाकरेंनी केलं. माहीममध्ये मी चालत जातो, चालताना लोक भेटतात, समाधान मिळतं. मला लोकांच्या तोंडावरील समाधान पुन्हा आणायचे आहे, असंही अमित ठाकरेंनी सांगितले. 




संबंधित बातमी:


Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर