नवी दिल्ली: राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवत महायुतीचा विजय झाल्यानंतर आता नव्या सरकारच्या स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण, याविषयी नेमका अंदाज येत नव्हता. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र  फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापैकी मुख्यमंत्री‍पदाची सूत्रे कोणाकडे जाणार, याविषयी अजूनही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. भाजपच्या गोटातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी (Maharashtra CM) पक्के असल्याचे सांगितले जात असले तरी मोदी-शाहांच्या धक्कातंत्राचा विचारता शेवटच्या क्षणी अनपेक्षित निर्णय होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. अशातच बुधवारी रात्री महाराष्ट्रातील एकेकाळचे मुख्यमंत्रि‍पदाचे दावेदार आणि भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. राज्याचा मुख्यमंत्री निवडण्यापूर्वी अमित शाह (Amit Shah) यांनी विनोद तावडे यांना का बोलावून घेतले असावे, याची चर्चा सध्या रंगली आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीत नेमके काय घडले, याची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.


प्राथमिक माहितीनुसार, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या भेटीत “महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा” या समीकरणावर चर्चा झाल्याचे समजते. अमित शाह यांनी तावडे यांच्याकडून राज्यातील जातीय समीकरण सखोलपणे समजून घेतल्याचे समजते. उभय नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाबाबतही चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा समाजाची मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाचा मतांवर किती परिणाम होऊ शकतो, याची बेरीज वजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला सतावत आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्याकडून मराठा समाजातील जातीय आणि राजकीय समीकरणे समजावून घेतली.


तसेच मराठा समाज आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांच्या भूमिकेविषयी अमित शाह यांनी सविस्तर माहिती घेतली. महाराष्ट्रात महायुतीच्या आगामी वाटचालीच्यादृष्टीने मराठा चेहरा किती महत्त्वाचा आहे, याबाबत सर्व गणितांची मांडणी तावडे आणि अमित शाह यांच्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. याशिवाय, राज्यातील आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसी मतांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. या सगळ्या बाबी समजावून घेतल्यानंतर आता अमित शाह आणि भाजपचे केंद्रीय नेते राज्यातील मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे सर्वांच्या नजर लागल्या आहेत. 


आणखी वाचा


मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा मावळताच एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, म्हणाले, श्रीकांतला उपमुख्यमंत्री करा