पुणे : लोकसभेप्रमाणेच ट्रम्पेट या चिन्हाने विधानसभेलाही शरद पवारांच्या उमेदवाराचा घात केल्याचं दिसून आलं. शरद पवार ज्यांना गद्दार म्हणाले होते त्या वळसे पाटलांनी देवदत्त शिवाजी निकम यांच्याविरोधात 1661 मतांनी निसटता विजय मिळवला आहे. पण त्यांचा हा विजय सहजसोपा झाला तो म्हणजे अपक्ष असलेल्या देवदत्त शिवाजी निकम या नावाच्या उमेदवाराने आणि त्याच्या चिन्हाने. या समान नाव असलेल्या आणि ट्रम्पेट चिन्ह असलेल्या देवदत्त निकमांनी 2,955 मतं घेतली.
समान नावाच्या आणि चिन्हाच्या उमेदवाराने घात केला
दिलीप वळसेंच्या एका डावाने पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांचा विजय हिरावून घेतलाय. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या देवदत्त निकमांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह हे ट्रम्पेट होते. ट्रम्पेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा वळसेंनी करून घेण्याची खेळी केली आणि त्यामुळेच ते तरल्याचं चित्र आहे. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या 1661 मतांनी झाला. त्याचवेळी अपक्ष देवदत्त शिवाजी निकमांना 2,955 हून अधिक मतं मिळाली.
शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2,955 मते शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांना मिळाली असती. त्यामुळे दिलीप वळसेंनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकमांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसेंचा पराभव झाला असता. त्यामुळे शरद पवारांच्या देवदत्त निकामांविरोधात विजयी मिळवताना वळसेंना देवदत्त शिवाजी निकमांनी तारले असंच म्हणावं लागेल.
दिलीप वळसे पाटील यांनी 1 लाख 6 हजार 95 मतं घेतली. तर शरद पवारांचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांनी 1 लाख 4 हजार 434 मतं मिळाली.
शरद पवार वळसेंना 'गद्दार' म्हणाले होते
विधानसभेच्या निवडणुकीच्या शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेत दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केला. ज्यांना आपण सर्व काही दिलं, गेल्या 25 वर्षांमध्ये अनेक मंत्रिपदं दिली त्यांनीच अडचणीच्या काळात साथ सोडल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्यामुळे गद्दारांना पाडा असं म्हणत पवारांनी दिलीप वळसेंच्या व त्यानंतर आंबेगावमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.
2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
1972 पासून राष्ट्रवादी काँग्रेसने 5 वेळा आणि काँग्रेस पक्षाने 3 वेळा या जागेवरून निवडणूक जिंकली आहे. याशिवाय गेल्या 5 निवडणुकांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली असून दिलीप वळसे पाटील यांनी विजय मिळवून हॅट्ट्रिक साधली आहे. 2019 च्या निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांनी शिवसेनेचे राजाराम भिवसेन बाणखेले यांचा 66775 मतांनी पराभव केला होता. आंबेगाव येथे गेल्या विधानसभा निवडणुकीत 66.35 टक्के मतदान झाले होते.
ही बातमी वाचा: