भोपाळ : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळमधील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या उमेदवारीबाबत पक्ष संभ्रमात आहे. त्यामुळेच भोपाळमधील विद्यमान खासदार आलोक संजर यांनी याच मतदार संघातून डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. बाबरी मशीदीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे साध्वी प्रज्ञा यांची उमेदवारी रद्द झाली तर आलोक संजर हे भाजपचे भोपाळमधील अधिकृत उमेदवार असतील.


साध्वी प्रज्ञा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप हायकमांड संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच साध्वी यांच्यासोबत विद्यमान खासदार आलोक संजर यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्या राम मंदिराबाबत बोलल्या की, "मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहे. भव्य राम मंदिर बनवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही."

याप्रकरणी साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात आयपीसीचे कलम 188 नुसार आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबरी मशीदीबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु ते स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच साध्वी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.