Akola News : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने अकोला महापालिका निवडणुकीत ओबीसींच्या जागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली. यापूर्वी महिलांसाठी (खुला प्रवर्ग) आरक्षित केलेल्या 37 जागा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित केल्या गेल्याआहेत. त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरूवात झाली.


अकोला महापालिकेच्या एकूण 91 जागांपैकी अनुसुचित जातींसाठी 15, अनुसुचित जमातीसाठी 2 तर महिलांसाठी 37 जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. तर ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात होता. न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण मंजुर केल्याने पुन्हा नव्याने आरक्षणाची सोडत घेतली गेली. यावर 30 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा विचार करुन 5 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार. 


आरक्षण सोडतीमुळे 'कही खुशी, कही गम' 


आजच्या महापालिकेच्या सोडतीमध्ये दिग्गजांना फारसा फटका बसलेला नाही. मात्र, प्रत्येक प्रभागामधील खुल्या जागांवर आता एकाच प्रभागातील विद्यमान नगरसेवकांमध्ये तिकीटासाठी चुरस होण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांतील भाजपचे दोन्ही माजी महापौर आणि उपमहापौरांचे प्रभाग 'सेफ' झाले आहेत. त्यामुळे माजी महापौर विजय अग्रवाल आणि अर्चना मसने यांच्या पुन्हा रिंगणात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच माजी उपमहापौर वैशाली शेळके आणि राजेंद्र गिरी यांचे प्रभागातही त्यांच्यासाठीचं आरक्षण कायम असल्यानं त्यांना नशीब आजमावता येणार आहे. 


   यासोबतच स्थायी समितीचे माजी सभापती बाळ टाले, विनोद मापारी यांचे प्रभागही 'सेफ' झालेत. मात्र, या आरक्षणाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिवसेनेचे गटनेते राजेश  मिश्रांना. त्यांच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये दोन जागा महिलांसाठी आणि तिसरी जागा अनुसुचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे. आजच्या आरक्षणामुळे भाजपच्या अनेक नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. आधीच्या  चारच्या प्रभागातील एकाच प्रभागात विजयी झालेल्यांपैकी किमान एका किंवा दोघा नगरसेवकांपैकी आता एकालाच तिकीट मिळणार आहे. त्यामुळे तिकीट न मिळाल्याने अनेक विद्यमान नगरसेवक बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, सुरेश पाटील, माजी विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, डॉ. झिशान हुसेन यांचे प्रभाग या आरक्षणात कायम राहिले आहेत. 


असं असणार अकोला महापालिकेचं आरक्षण : 


एकूण प्रभाग : 30 
एकूण जागा  : 91



  • महिलांसाठी राखीव : 46 जागा

  • अनुसुचित जाती : 15 जागा (पैकी 8 महिला)

  • अनुसुचित जमाती : 2 जागा (पैकी 1 महिला) 

  • सर्वसाधारण : 50 जागा (महिलांसाठी 25 जागा)

  • ओबीसी : 24 जागा (महिलांसाठी 12 जागा)



अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव जागा 


अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार एकूण 15 प्रभागातील 15 जागा अनुसुचित जातींच्या उमेदवारांकरीता राखीव आहे. यातील 8 जागा या अनुसुचित जाती महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. ज्यात 3,6, 9, 10, 12, 18, 19, 23 'अ' या जागांचा या राखीव जागांमध्ये समावेश आहे. 



अनुसुचित जमाती महिलासाठी राखीव जागा  


अकोला महापालिकेत अनुसुचित जमाती(एसटी)साठी दोन जागा राखीव आहेत. यातील '24-अ' ही जागा अनुसुचितसाठी महिलेसाठी राखीव असणार आहे. 


सर्वसाधारण गटासाठी राखीव असलेल्या जागा खालीलप्रमाणे : 


सर्वसाधारण राखीव प्रभाग आणि गट : 1, 3, 5,7,8, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 26, 27, 29 ब, 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 क, 30 ड. 


महिला राखीव : 1, 3, 5, 7, 8, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 21, 22, 26, 27, 28, 29 ब, 4, 6, 9, 19, 25, 30 क. 


महिला झाल्या आनंदित...


महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांकरिता 46 जागा राखीव झाल्यात. पैकी काही प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्या असल्याने निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. प्रभागातील प्रत्येक पक्षाचा प्रभावी नेता जागा सोडणार नाही. त्यामुळे इच्छुकांना येथे घराच्या महिलांना निवडणूक रिंगणात उतरविणे भाग पडेल किंवा बाजूला सोयीचा प्रभाग निवडावा लागणार आहे.


सध्याच्या महापालिकेतील पक्षीय बलाबल


एकूण जागा : 80



  •  भाजप : 48

  • काँग्रेस : 13

  • शिवसेना : 08

  •  राष्ट्रवादी : 05

  • वंचित बहुजन आघाडी : 03

  •  एमआयएम : 01

  • अपक्ष : 02