मुंबई : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे नेते नवाब मलिक चांगलेच चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी ते तुरुंगात होते. भाजपाने आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर अजित पवार मलिक यांना प्रचाराच्या माध्यमातून ताकद पुरवणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. याबाबतचा संभ्रम मात्र आता अजित पवार यांनी दूर केला आहे.  


अजित पवार यांनी काय सांगितले?


अजित पवार आज (7 नोव्हेंबर) पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते. यावेळी बोलताना "आम्ही त्यांना (नवाब मलिक) उमेदवारी दिली आहे. त्यांना आम्ही घड्याळ हे चिन्हही दिलेलं आहे. आम्ही त्यांच्या रॅलीमध्ये जाणारच ना. नवाब मलिक यांच्यावर आतापर्यंत फक्त आरोप झाले आहेत," असे अजित पवार म्हणाले. तसेच आरोप सिद्ध झाल्याशिवाय, त्यांना दोषी कसे ठरवता? असा सवालही त्यांनी केला आहे. 


सना मलिक, नवाब मलिक यांना तिकीट


भाजपाने नवाब मलिक यांच्यावर त्यांचे गँगस्टर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे दाऊद आणि त्याच्या भावाच्या केसेसशी संबंध असलेल्या व्यक्तीचा आम्ही प्रचार करणार नाही, असं भाजपाने मह्टलं आहे. याच भूमिकेमुळे भाजपाने सुरुवातीला मलिक यांना तिकीट देण्यास विरोध केला होता. मात्र दबाव झुगारून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट दिलेले आहे. मलिक यांची कन्या सना मलिक यादेखील अणुशक्तीनगर या मतदारसंघातून यावेळची विधानसभा निवडणूक लढवता आहेत. तर नवाब मलिक हे शिवाजीनगर मानखुर्द या जागेवरून अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. 


अजित पवार मर्द माणूस


दरम्यान, अजित पवार यांनी मलिक यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यावर भाजपा काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या भूमिकेवर मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हा मर्द माणूस आहे. अजितदादा जो शब्द देतात तो ते शब्द पाळतात. आमच्या कठीण काळात पाठीशी उभा राहिले आणि आम्हाला उमेदवारी देखील दिली. आता महायुती आणि महाविकास आघाडी माझ्याविरोधात आहे मात्र जनता माझ्यासोबत आहे, असे मलिक म्हणाले.


Ajit Pawar Video News :



हेही वाचा :


काका शरद पवारांवर टीका होताच, पुतण्याचा थेट सदाभाऊंना फोन, अजितदादांकडून 'हे सगळं बंद करण्याचा' सल्ला!


Sadabhau Khot on Sharad Pawar: टीकेची झोड उठताच सदाभाऊ खोत नरमले, शरद पवारांबाबातच्या वक्तव्यावरुन जाहीर माफी