नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघ (Ramtek Assembly Constituency) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सोडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या मतदारसंघात बंडखोरी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. 


भास्कर जाधव म्हणाले की, रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी केलीय, याची मला वेदना होतेय. काँग्रेसची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी राजेंद्र मुळक यांच्यावर कारवाई करायला हवी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीमागे इथल्या काँग्रेस नेत्याचा हात आहे, असा आरोप त्यांनी सुनील केदार यांचे नाव न घेता त्यांच्यावर केला. 


मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं योग्य नाही


पूर्व विदर्भात फक्त एक जागा आम्हाला मिळाली, त्या जागेवर काँग्रेसने बंडखोरी केलीय. आजपर्यंत बंडखोर जिल्हाध्यक्षांवर काँग्रेसने कारवाई केली नाही, हे वेदनादायी आहे. रामटेक लोकसभा आम्ही काँग्रेसला दिली, पण त्याचं फळ आमच्या पदरात हे पडणार असेल तर हे वेदनादायक आहे. यामुळे तरुण कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. बंडखोरीचा विषय आमच्या पक्षाने गांभीर्याने घ्यावा. आघाडीत असं वर्तन योग्य नाही. काँग्रेसकडून अशा प्रकारचं वर्तन नेहमी होतंय. आमचा उमेदवार निवडून येईल. पण मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं योग्य नाही, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केलाय. 


मी नवाब मलिक यांच्या पाठीमागे आजंही खंबीरपणे उभा


राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखूर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नवाब मलिक यांच्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडलीये. दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही, असे म्हणत भाजपने नवाब मलिक यांच्या प्रचाराला विरोध केलाय. तर राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत. याबाबत विचारले असता भास्कर जाधव म्हणाले की, नवाब मलिक माझ्या पक्षाचे नाही. पण भाजपनं त्यांच्यावर केलेले आरोप खोटे आहेत. मुंबईत 1993 साली झाले, आणि नवाब मलिक साथीदार तुम्हाला 2022 साली दिसले? मी तेव्हाही नवाब मलिक यांच्या पाठीमागे होतो आजंही खंबीरपणे उभा आहे. त्यांना त्या प्रकरणात गोवले असल्याची प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे. 


आणखी वाचा 


फडणवीसजी, तुम्ही स्वयंसेवक काळी टोपी घालून कोणाचा निषेध करता? सचिन खरात यांचा पलटवार, नेमकं काय आहे प्रकरण?