बीड : राज्यातील लक्षवेधी लढती आणि जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी पारंपरिक लढती होत असून परळी आणि माजलगाव मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा शब्दा जिल्ह्यात प्रमाण मानला जात आहे, त्यामुळे येथील मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येणार, कोणता उमेदवार पडणारे याची चर्चा जिल्ह्यात आहे. कारण, परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke) हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी आरक्षण चळवळीच्या लढ्यावेळी आपलं घर जाळण्यात आल्याची आठवण सांगितली. तसेच, मी कोणाच्याही नावाने तक्रार केली नाही, असेही ते म्हणाले.
मी असं काय पाप केलं होतं.. माझं आणि माझ्या भावाचे घर जाळण्यात आले. आंदोलन करण्याची ही पद्धत होती काय? घर सोडून आम्हाला पळून जावं लागलं. दोन दोन अडीच वर्षाच्या नातवांना अक्षरशः बंगल्यावरून खाली झेलावं लागले. आंदोलन करण्याची ही कसली रीत आणि संस्कृती आहे, असा सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी कोण्याही आंदोलनकर्त्यांच्या नावाची तक्रार दिली नाही. मी कोणालाही अटक करण्यास लावले नाही. इतर कार्यालये जाळण्यात आली त्याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली होती. तक्रार केली म्हणून मला बदनाम करण्यात आले. जर, मी तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे भावनिक वक्तव्य महायुतीचे माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी केले आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना पाहायला मिळत आहे. तर, रमेश आडसकर हे अपक्ष उमेदवारही मैदानात आहेत.
माजलगाव मतदारसंघात तिरंगी लढत
माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र, अजित पवारांकडून त्यांनाच उमेदवारीचा आग्रह करण्यात आला. त्यामुळे, राष्ट्रवादी महायुतीकडून माजलगाव मतदारसंघासाठी प्रकाश सोळंके यांचे नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर, प्रकाश सोळंके यांचे पुतणे नाराजी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. कारण, सोळंके यांनी त्यांच्या पुतण्याला आपला राजकीय वारसदार म्हणून घोषित केले होते. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मोहन जगताप निवडणूक लढवत आहेत. तर, गतवेळेसचे विरोधक असलेले रमेश आडसकर हे अपक्ष मैदानात उतरले आहेत.
हेही वाचा
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत