मुंबई : राजधानी मुंबईतील काही महत्वाच्या मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले असून माजी मंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार नवाब मलिक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, अजित पवारांच्या उमेदवाराचा आपण प्रचार करणार नाही, भाजपा नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही, अशा शब्दात भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आता, नवाब मलिक (Nawab malik) यांनी आपल्या उमेदवारीवर भाष्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मानखुर्द शिवाजीनगरचा मी उमेदवार आहे, आणि निवडणुकीला देखील सामोरे जाणार आहे. माझ्या उमेदवारीला पक्षाकडून विरोध होण्याचं काही कारण नाही, कारण पक्षाकडूनच मला एबी फॉर्म देण्यात आला आहे. पक्ष माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे म्हणत अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी आपल्यासोबत असल्याचे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मला नशा मुक्त मानखुर्द-शिवाजीनगर करायचा आहे आणि त्यामुळेच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. समाजवादी पक्षापासून लांब राहा असं मी स्पष्टपणे सांगत आहे. कारण समाजवादी पक्षाच्या कार्यालयात नशा पान सुरू असल्याचे पाहायला मिळते, असे म्हणत मलिक यांनी समाजवादी पक्षावर हल्लाबोल केला. दरम्यान, मदरशांमध्ये जिहाद सुरू असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला, तो चुकीचा आहे. मदरशा म्हणजे शाळा, शाळेमध्ये अशा गोष्टी कशा काय होऊ शकतात?, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्राबाबू नायडू - मलिक
अजित पवार यांची तुमच्यामुळे अडचण होऊ शकते, या प्रश्नावरही मलिक यांनी स्पष्टपणे उत्तर दिलंय. अजित पवार हे महाराष्ट्राचे चंद्रबाबू नायडू आहेत. अल्पसंख्याक समाजासाठी आतापर्यंत जितकं कोणी काही केलेलं नाही, तितकं अजित पवार यांनी केलं आहे. मौलाना आझाद महामंडळाबाबतचा निर्णय मी माझ्या कार्यकाळात घेतला होता, यासोबतच शाळातल्या शिक्षकांचे पगार वाढ करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या होत्या. अजित पवार कायम अल्पसंख्यांक समुदायाच्या पाठीशी राहिले आहेत, विशाळगड घटना, सातारा दंगल आणि मीरा रोड येथील दंगल या ठिकाणी अजित पवारांनी स्वतः लक्ष घातलं होतं. त्यामुळे अजित पवारांच्या पाठीशी राहण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. भविष्यात अजित पवारांशिवाय सरकार बसू शकणार नाही असेही मलिक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं.
दाऊशी संबंधाचे आरोप फेटाळले
असला कसलाही प्रकार बी केलेला नाही, त्यामुळे माझ्यावर जर असे कोणी आरोप करत असेल तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. काही दैनिकांनी माझ्याबाबत बातम्या छापल्या, त्यांना मी नोटीस पाठवली आहे. आता, केवळ नोटीस पाठवून थांबणार नाही, त्यांच्यावर फौजदारी कारवाई देखील करणार आहे, अशा शब्दात नवाब मलिक यांनी इशारा देत दाऊदसंदर्भातील सर्वच आरोप फेटाळले आहेत.
हेही वाचा
महायुतीकडून सदा सरवणकर यांना मोठी ऑफर, अर्ज माघारी घेणार?; राजकीय वर्तुळात खळबळ