पुणे : राज्यात महायुती म्हणून एकत्र असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी चिंचवड (pune) महापालिकेत भाजपविरुद्ध दंड थोपटले आहेत. त्यामुळे, या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवारांची (Ajit pawar) राष्ट्रवादी असाच थेट सामना आहे. त्यातच, पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असून पुणे महापालिकेतही 2 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर (BJP) टीका केली. तसेच, पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारीवरुन भाजपने केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

Continues below advertisement

सन 1992 ते 2017 पर्यंत मी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला, हवा तो विकास केला. मात्र, 2017 साली एक लाट होती. त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाला. आता त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या (भाजप) पक्षात गेले आहेत. शरद पवारांनी पिंपरीत विकासाला कशी गती दिली, हे सांगता अजित पवारांनी साहेबांचं कौतुक केलं. तसेच, यावेळी, भाजपवर गंभीर आरोप करत हफ्तेखोरी सुरु असल्याचा दावाही त्यांनी केला. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावलेली आहे, अनेक रस्त्यावर अतिक्रमण झालंय, तिथं हफ्तेखोरी सुरु असल्याचं दिसतं. गेल्या नऊ वर्षात भाजपच्या सत्ता काळात हा असला विकास झालाय. टेंडरमध्ये रिंग केली जाते, दादागिरी केली जाते. मी पुरावे देईन, पुराव्या शिवाय मी बोलणार नाही, कोणावर बिनबुडाचे आरोप करणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, गुन्हेगारी उमेदवारीवरुन मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेवरुनही पलटवार दिला.

मुरलीधर मोहोळांवर पलटवार

एका व्यक्तीला परदेशात जायला कोणी मदत केली? त्याला पासपोर्ट कोणी दिला? तो कसा पळाला? त्यांनीसुद्धा गेल्या काही वर्षात कोणाकोणाला कशी उमेदवारी दिली, याची पण माहिती काढा, असे म्हणत अजित पवार यांनी मुरलीधर मोहोळ यांनीच निलेश घायवळला विदेशात जायला मदत केल्याचे संकेत दिले. तसेच, मी पुण्यात गेल्यावर भाजपची आणि माझी यादी दाखवतो. कोणाचे उमेदवार कसे आहेत हे पाहा, मग सगळं स्पष्ट होईल, असेही अजित पवारांनी म्हटले. तर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पुत्रावरही गुन्हे दाखल आहेत, असा आरोप काँग्रेसने केला होता. त्यावरूनही, अजित पवारांनी भूमिका मांडली. गुन्हे दाखल आहेत, पण त्यात तो दोषी ठरलाय का? आता माझ्यावर 70 हजार कोटींचे आरोप झाले, ज्यांनी आरोप केले त्यांच्या सोबत मी बसलोय ना? मग आरोप म्हणजे दोषी नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्र्‍यांनी दिलं.

Continues below advertisement

गुंड आंदेकर कुटुंबीयांना राष्ट्रवादीची उमेदवारी

पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या उमेदवारीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबात अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकरांच्या घरात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या पक्षाकडून देण्यात आला AB फॉर्म देण्यात आले आहे. त्यानंतर, अजित पवारांवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. 

भाजपकडूनही गुंडाच्या पत्नीला उमेदवारी

भाजपनेही कात्रजमध्ये आंबेगाव भागातील प्रभाग क्रमांक 38 मधून देविदास चोरघेची पत्नी प्रतिभा चोरघेला उमेदवारी दिली आहे. रोहिदास चोरघेंवर हत्येचे अनेक गुन्हे नोंद असून अपहरण, खंडणी, गोळीबार अशा गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे. त्यामुळे, गुन्हेगारीमुक्त पुणे करण्याचं आश्वासन देणाऱ्या प्रमुख राज्यकर्त्यांच्या पक्षाकडूनच गुन्हेगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुण्यातून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. 

अजित दादांच्या आरोपांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष उत्तर देतील,स्थानिक आमदार अन शहराध्यक्षांची बोलती बंद?

अजित पवारांच्या आरोपानंतर स्थानिक आमदार महेश लांडगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र नेहमीप्रमाणे त्यांनी फोन उचलणं टाळलं. तसेच आमदार शंकर जगतापांनी मी प्रचारात व्यस्त आहे, असा निरोप त्यांच्या फोनवरून समर्थकाद्वारे दिला. तर शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी उद्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमच्या प्रचाराचा नारळ फोडायला येतायेत. त्यावेळी तेच अजित पवारांच्या आरोपांवर उत्तर देतील. असं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळं अजित दादांच्या आरोपांमुळं स्थानिक आमदार आणि शहराध्यक्षांची बोलती बंद झालीये का? किंबहुना अजित दादांच्या दराऱ्याला ते घाबरत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.

हेही वाचा

मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन सोलापुरात भाजपच्या दोन गटात राडा, मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; मोठा बंदोबस्त तैनात