मुंबई : निवडणुकीत व्यस्त असलेल्या शिक्षकांना आज (२१ ऑक्टोबर) मतदानाच्या दिवशी उशीर झाल्यास मतदानाच्या दुसऱ्या दिवशी कामावर उशीरा येण्याची  सूट जिल्हा अधिकारी आणि जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.या परिपत्रकामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगरात निवडणुकीचे काम करणाऱ्या शिक्षकांना कामानिमित्त उशीर होऊ शकतो, त्यामुळे उशीर झाल्यास त्यांना उद्याच्या दिवशी कामावर उशीरा येण्याची सूट देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत अनेक शिक्षक मध्यरात्रीपर्यंत तर काही शिक्षक पहाटे पर्यंत काम करत होते आणि त्यानंतर त्यांना परत शाळेत कामावर यावं लागले. त्यामुळं एकप्रकारे शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेने पाठपुरावा केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी यांनी खबरदारी घेऊन हे परिपत्रक काढून शिक्षकांना दिलासा दिला आहे.


मुंबई उपनगर जिल्ह्यात कार्यरत कर्मचारी हे मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील असल्याने त्यांना निवडणुकीची कामे पूर्ण होईपर्यंत घरी जाण्यास  उशीर होतो किंवा दुसरा दिवस देखील उजाडतो. ज्या मतदारसंघातून मुख्यालयात पोहचण्यासाठी प्रवासाला जास्त वेळ लागणार असेल तर मतदान साहित्य जमा करण्याच्या तारेखेनंतरचा दिवस सामान्य कर्तव्य कालावधी मानण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यरत असलेले कर्मचारी, अधिकारी यांची २२ ऑक्टोबरला गैरहजेरी लावली जाणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.