मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 1 किंवा 2 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई दौरा होणार आहे. मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीला शाह उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महायुतीच्या सत्ता फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असून भाजपचा शपथविधी 3 नोव्हेंबरनंतरच होणार असल्याची माहिती भाजप सूत्रांनी दिली आहे.


विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र भाजपला गेल्या विधानसभेपेक्षा यंदा 17 जागा कमी मिळाल्या आहेत. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे भाजपला शक्य नाही. त्यामुळे हीच वेळ साधत शिवसेनेने भाजपला युतीच्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देत, मुख्यमंत्री पदावर आणि इतर महत्वाच्या पदावर दावा केला आहे. तसेच मागण्या मान्य पूर्ण न झाल्यास इतर पर्याय खुले असल्याचा इशाराही शिवसेनेनं दिला आहे.

मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला नव्हता

भाजप अध्यक्ष अमित शाह उद्याच्या बैठकीला येणार नाहीत. अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद हा शब्द वाटाघाटीत शिवसेनेला कधीच दिला नव्हता. चर्चेला बसल्यानंतर शिवसेनेची काय मागणी आहे, त्यावर चर्चा होईल. मेरिटवर मागण्या मान्य करु अगदीच आडमुठी भूमिका आम्ही घेणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांना काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांच्याकडून मागणी झाली होती, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाच शब्द दिलेला नाही हे अमित शाह यांनी मला स्पष्ट केलं आहे.