मुंबई :  शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वरळी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅली काढली. दरम्यान दुपारी 12.15 च्या सुमारास आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे, आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.


दरम्यान आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि जनतेचे आभार मानले. तसेच मनसेने आदित्य यांच्या विरोधात उमेदवार दिला नसल्याबाबत विचारले असता देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांचे आभार मानले.  जे जे या निवडणुकीसाठी आदित्यला आशीर्वाद देताहेत त्यांना मी धन्यवाद देतो, मी या सर्वांप्रती ऋणी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे यांचे विशेष आभार मानले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, वरळीच्या जनतेच्या आदित्यचा स्वीकार केला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.  माझ्यापर्यंत निवडणूक न लढविण्याची आमच्या कुटुंबाची परंपरा होती. मात्र आता नवीन पिढी आहे. त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विचार नवे आहेत. तरुणांच्या विचारानेच देश आणि राज्य पुढे जावे ही जनतेची इच्छा आहे, असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची परंपरा जनतेची सेवा करण्याची आहे. ती पुढच्या पिढीत देखील कायम आहे. आम्ही निवडणूक न लढवता सेवा केली मात्र ही आजची नवी पिढी आहे. आदित्यासोबत तुमचा आशीर्वाद कायम राहिलं, हा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सर्व शिवसैनिक आणि जनतेचा आभारी आहे. महाराष्ट्रासोबत वरळीचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. दरम्यान रॅलीदरम्यान बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या असल्याचे सांगितले.