मुंबई : विधानसभा निवडणुकीचा रोमांच शिगेला पोहोचत आहे. उद्या, चार ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे आज अनेक दिग्गज उमेदवार आपापले अर्ज दाखल करत आहेत. यासाठी उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन केला जात आहे.


वरळीतून आदित्य ठाकरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी आदित्य ठाकरे पदयात्रा काढून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या निमित्ताने वरळीत शिवसेना नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते जमले आहेत. ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच कुणी व्यक्ती विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने त्यामुळे उत्सुकता आहे. आजच्या उमेदवारीसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं जणार आहे. त्यासाठी शिवसेनेनं तयारी केली आहे. दरम्यान आदित्य यांच्याविरोधात मनसे आपला उमेदवार उतरवणार नाही आहे.  सलग दुसऱ्या यादीतही मनसेनं वरळीमधून उमेदवारीची घोषणा केलेली नाही. वरळीत आदित्यविरोधात उमेदवारी न देण्याबाबत राज ठाकरेंनी नेत्यांसोबत चर्चा केली आणि त्यानंतर हा निर्णय घेतला.

 परळी मतदारसंघातून बहिण-भावाची लढत
विधानसभा निवडणुकांमध्ये परळी मतदारसंघातून बहिण-भावाची लढत बघायला मिळणार आहे. या भागात भाजपकडून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे निवडणूक लढणार आहेत. त्यासाठी आज ते आपले उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे परळीमध्ये काय होतं. याकडे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला उत्सुकता आहे.  मुंडे  बहीण भावामधील लढाईकडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. दोघंही आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहोचले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं. दरम्यान, अजित पवारांचा आजचा बीड दौरा रद्द झाला आहे. जिल्ह्यातल्या चारही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी अजित पवार बीडला जाणार होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून  अर्ज दाखल करणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. थोड्याच वेळात ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीनंतर विरोध देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आला. मात्र लोकसभा निवडणुकीत कोथरुडमध्ये जसं मताधिक्य दिलं तसंच विक्रमी मताधिक्य चंद्रकांत पाटील यांना देणार, असा विश्वास विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.  पुण्यात काल चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपनं मेळावा घेतला होता. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून कोथरुडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं त्या नाराज असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या.

उदयनराजेंच्या विरोधात श्रीनिवास पाटील अर्ज दाखल करणार

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या जागेवर राष्ट्रवादीकडून आज उदयनराजेंच्या विरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील हे अर्ज दाखल करणार आहेत.  शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे सध्या राष्ट्रवदीच्या गोटात चैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे उदयनराजेंनी गेल्या तीन टर्ममध्ये झालेल्या निवडणुकांमधील मतांची टक्केवारी घसरताना पहायला मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांच्या विरोधात एक लाख 26 हजार मतांच्या फरकाने उदयनराजे यांनी विजय मिळवला होता.

ऋतुराज पाटील सायकलवरून जाऊन अर्ज भरणार
कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून आज आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे सायकलवरून जाऊन अर्ज भरणार आहेत. मात्र तत्पूर्वीच महाडिक आणि पाटील गटात सोशल वार सुरू झालं आहे. आमदार सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांची सायकलवरील कार्टून्स तयार करून ती व्हायरल केली जात आहेत.  नेहमीच महाडिक आणि सतेज पाटील गटात राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष आता पुन्हा उफाळून आला आहे.