नाशिक : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी नांदगावचे पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. नांदगावच्या जागेवर आपला उमेदवार जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गद्दाराला आणि गुंडागर्दी करणाऱ्यांना सांगणं आहे, राज्यात आमची सत्ता येणार आहे. जर इथे त्या दोघांनी, कुठल्याही गुंडांनी एका व्यक्तीला हात लावला तर याद राखा, बर्फाच्या लादीवर झोपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला. तुम्हाला असलेली मस्ती घरात दाखवा, जनतेसमोर हे चालणार नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.  


आपलं सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षात स्थानिक जनतेवर अन्याय करणाऱ्यांना उत्तर देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 20 तारखेला महाराष्ट्रात मशाल पेटणार, शरद पवारांची राष्ट्रवादी लढतेय तिथं तुतारी वाजणार, काँग्रेस असेल तिथं हात दिसणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. भयमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. आपल्याला एकत्र यावंच लागेल, असंही ते म्हणाले.


शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी 


पन्नास खोके एकदम ओके, यांना आता नॉट ओके करायचे आहे. या गद्दारांना तिकीट कोणी दिले, यांना निवडून कोणी आणले? तुम्ही निवडून आणलं पण तुमच्यावर आवाज चढवतात हे चालणार नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.महाराष्ट्रात महाविकास आघडीचे बहुमताचे सरकार येणार आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 


सरकार कडून अन्याय होतोय, भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करते आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आलं होतं तेव्हा शेतकरी कर्जमुक्ती केली, त्याची बॅनरबाजी केली नव्हती, असं  आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आज 1500 रुपये देतात, 2014 ला भा 15  लाख देणार होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


गारपीट, अवकाळी पाऊस, दुष्काळ असेल, करोना होता तेव्हा मविआचे मंत्री गावोगावी यायचे. जेवढी शक्य असेल तेवढी मदत करण्यात आली, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी कृषी मंत्र्यांचं नाव विचारलं.जनतेला कृषीमंत्री कोण आहे हे माहिती नाही, हे किती भयानक आहे , याचा विचार करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. नोटबंदीमुळं शेतकरी, तरुणांचे हाल झाले. गृहिणींचे हाल झाले, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी महागाई परवडणारी आहे का असा सवाल देखील केला. महागाईच्या काळात दरमहा कोणीतरी 1500 रुपये देणार याचा उपयोग काय असा सवाल आदित्य  ठाकरेंनी केला. 



इतर बातम्या :