Varun Sardesai Thackeray Group मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वंच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांबाबत चर्चा सुरु आहे. तर भाजपकडून आज किंवा उद्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. याचदरम्यान ठाकरे गटाकडून पहिला उमेदवारही ठरवण्यात आला आहे. 


ठाकरे गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून (Vandre East Assembly constituency) युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जाहीर केले आहे. यानंतर वरुण सरदेसाई यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. डबल ग्रॅज्युएट आणि लोकांच्या संपर्कात राहणारा, असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी प्रचार सुरु केला आहे.  त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाई विरुद्ध स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. 






अनिल परब काय म्हणाले?


ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात वरुण सरदेसाई यांच्या नावासंदर्भात घोषणा केली. अनिल परब यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटलो. उद्धव ठाकरेंनी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून वरुण सरनाईक यांचे नाव निश्चित केले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. 


कोण आहे वरुण सरदेसाई?


वरुण सरदेसाई ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.  वरुण सरदेसाई यांच्यामुळे अनेकदा वादही निर्माण झाला आहे. वरुण सरदेसाई यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.


महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक-


महाराष्ट्रात यंदा एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडेल. 


आणखी वाचा:


Maharashtra VidhanSabha Election 2024: शेवट गोड करण्यासाठी सगळ्यांचा अट्टाहास; 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी एकाच दिवशी 4 पक्षांनी ठोकला शड्डू