मुंबई : अजित पवार गटाचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवीन माहिती समोर येताना दिसत आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या तीन मारेकऱ्यांनी वांद्रे (Bandra) येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला हत्या केली होती. सिद्दीकींच्या (Baba Siddique Murder) हत्येचा कट कसा रचण्यात आला, याविषयी पोलिसांन एक-एक करुन धागेदोरे सापडत आहेत. मात्र मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांना  कार्यालयाजवळच मारायचे का ठरवले? असा सवाल उपस्थित होत आहे.


वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला होता. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला त्यादिवशी विजयदशमी होती. त्यामुळे येथून अनेक देवीच्या मूर्ती वाजतगाजत विसर्जनासाठी (Navratri 2024) नेल्या जात होत्या. झिशान सिद्दीकींच्या कार्यालयाबाहेर कायमच कार्यकर्त्यांचा मोठा राबता असतो. कार्यालयपासून काही अंतरावर पोलिस स्थानक आहे.एवढी वर्दळ असताना देखील बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्यांनी हीच जागा निवडली.  महिनाभर बाबा सिद्दीकी यांची रेकी केल्यानंतर त्यांच्या हत्येसाठी योग्य असल्याचे  पोलिसांनी आरोपींच्या केलेल्या चौकशीत समोर आले आहे.  


महिनाभराच्या रेकीनंतर मारेकऱ्यांनी ठरवली हत्येची जागा


माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी  त्यांचे घर आणि कार्यालयाची मारेकऱ्यांनी महिन्याभर पाहणी केली. त्यावेळी सिद्दीकी हे त्यांच्या घरून निघताना  कार थेट त्यांच्या इमारतीत जायची, त्यानंतर सिद्दीकी थेट कार्यालयाच्या दारात उतरायचे. त्यामुळे हल्ला करण्यासाठी हवा तसा वेळ आणि टाईम या गोष्टी जुळत नव्हत्या, महिनाभराच्या रेकीनंतर आरोपींच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सिद्दीकी कार्यालयात गेल्यानंतर गाडी कार्यालयापासून 80 मीटर अंतरावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी करायचे. ही जगा हल्ला करण्यासाठी योग्य असल्याचे ठरवूनच हा हल्ला केला, अशी माहिती आरोपींनी दिली.  


बाबा सिद्दीकींच्या हत्येवेळी आरोपींनी घेतला अंधाराचा फायदा


विशेष म्हणजे त्या दिवशी दुर्गा विसर्जन असल्याने गर्दीही होती आणि पदपथावरील दिवे नसल्याने अंधाराचा फायदाही आरोपींना घेता आला असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी मारेकरी अर्धा तासापेक्षा जास्तवेळ या परिसरात थांबून राहिले होते. विसर्जन मिरवणुकीतील देवीभक्तांना मोफत सरबत वाटले जात होते. मारेकऱ्यांनी हे सरबत प्यायले होते. 


हे ही वाचा :


बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला