India TV-CNX Opinion Poll : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) काही महिनेच उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मात्र यावेळची लढत रंजक असणार आहे. कारण 2024 ची लोकसभा निवडणुकीत दोन मोठ्या आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे. यातील भाजपप्रणित NDA आणि विरोधकांची INDIA यांच्यात सामना पाहायला मिळेल. दरम्यान आता निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) एक सर्वे केला. आज देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 318 जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात. 'इतर' मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.
भाजपच्या जागा कमी होऊ शकतात
या ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या निवडणुकीत देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल पण भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपच्या जागा 303 वरुन 290 पर्यंत खाली येऊ शकतात, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला 100 चा आकडा काही गाठता येणार नाही. काँग्रेसच्या जागा 52 वरुन 66 पर्यंत वाढू शकतात.
पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता
दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागा 22 वरुन 29 पर्यंत वाढू शकतात आणि सभागृहात तृणमूल हा तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. तर, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वाय.एस.आर. काँग्रेसच्या जागा कमी होण्याचा अंदाज असून त्या 22 वरुन 18 वर येऊ शकतात.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, ओडिशात बिजू पटनायक यांच्या पक्षाच्या जागा वाढू शकतात
सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाकडे 6 जागा आहेत, त्या 11 पर्यंत वाढू शकतात. देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 20, काँग्रेस 9, शिवसेना (शिंदे) 2, शिवसेना (ठाकरे गट) 11, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या जागा एक वरुन दहापर्यंत वाढू शकतात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाच्या जागा 12 वरुन 13 पर्यंत वाढू शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा 12 वरुन दोन पर्यंत खाली येऊ शकतात.
यूपी, गुजरात, उत्तराखंडमध्ये एनडीएला मोठा विजय मिळू शकतो
उत्तर प्रदेश हे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठं राज्य आहे. इथून 80 खासदार निवडून लोकसभेत पोहोचतात. इथे ज्या पक्षाचं किंवा युतीचं वर्चस्व आहे, ते केंद्रात सरकार बनवतात. त्यामुळे सर्व पक्षांसाठी यूपी खूप महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात सर्वात मोठा विजय मिळू शकतो. इथे लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी 73 जागा NDA ला मिळू शकतात. तर INDIA ला उर्वरित सात जागा मिळू शकतात. याशिवाय गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंडमधील पाचही जागा भाजपच्या ताब्यात जाऊ शकतात.
कर्नाटकात भाजपला 20 जागा मिळू शकतात
कर्नाटक विधानसभा काँग्रेसने जिंकली आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला फायदा होईल अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत इथल्या 28 पैकी 20 जागा एनडीएला मिळू शकतात, तर INDIA ला सात जागा मिळू शकतात. एक जागा जनता दल-एसला मिळण्याचा अंदाज आहे.
केरळमध्ये INDIA ला 20 जागा मिळण्याची शक्यता
दुसरीकडे, INDIA केरळमधील लोकसभेच्या सर्व 20 जागा जिंकू शकते, तर पश्चिम बंगालमध्ये INDIA ला 42 पैकी 30 जागा मिळू शकतात आणि उर्वरित 12 जागा एनडीएच्या खात्यात जाऊ शकतात.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सचे हे सर्वेक्षण देशभरातील एकूण 44,548 प्रभावशाली मतदारांकडून त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मिळालेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणात समाविष्ट एकूण मतदारांपैकी 23,871 पुरुष आणि 20,677 महिलांनी आपले मत दिलं आहे.
हेही वाचा