दरम्यान, मातोश्रीवरील बैठकीनंतर एकनाथ शिंदे रात्री उशिरा मालाडमधील हॉटेल 'द रिट्रीट'कडे रवाना झाले. आज (11 नोव्हेंबर) सकाळी 9.30 वाजता द रिट्रीट हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिल्यानंतर शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने सर्व आमदारांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
अरविंद सावंत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार
शिवसेना आज एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. दिल्लीत सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचं खुद्द अरविंद सावंत यांनी ट्वीटद्वारे सांगितलं.
"लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारुन शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वा. दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे," असं ट्वीट अरविंद सावंत यांनी केलं आहे.
भाजप कोअर कमिटीची बैठक
भाजपच्या कोअर कमिटीची आजही बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता 'वर्षा' बंगल्यावर ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सद्य परिस्थितीवर या बैठकीत खलबतं होणार आहे.
शरद पवार-सोनिया गांधी भेट, संजय राऊतही दिल्लीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. याचवेळी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी संजय राऊतदेखील दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेबाबत आधी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बोलणं होईल. त्यानंतर संजय राऊत यांच्यातही सत्तास्थापनेबाबत खलबतं होतील, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान संजय राऊत सोनिया गांधी यांचीदेखील भेट घेण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या गोटात खलबतं
एकीकडे दिल्लीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसच्या गोटात खलबतं सुरु आहेत तर दुसरीकडे सिल्वर ओकवर दिल्लीतून काँग्रेसच्या निरोपाची वाट आहे. दिल्लीत आज काँग्रेसची बैठक होणार असून त्यामध्ये शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यायचा किंवा त्यावर आणखी काही अटी घालायच्या यावर निर्णय होणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुंबईत यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे
भाजपचा सत्ता स्थापन करण्यास नकार
सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल मिळाला असला तरी भाजप सत्ता स्थापन करणार नाही. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना शुभेच्छा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर काल (10 नोव्हेंबर) राजभवनावर भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांनी भाजप सत्ता स्थापन करणार नसल्याची माहिती दिली.
संजय राऊत यांचा भाजपला टोला
शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. भाजप मागे हटली आता भाजपचा मुख्यमंत्री कसा बनेल, असा सवाल उपस्थित केला. तसंच उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे राज्यात कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकच
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत शिवसैनिकालाच बसवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला. मात्र हा अप्रत्यक्ष इशारा देताना युती तुटली नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. काल दुपारी मालाडमधील रिट्रीट हॉटेलमध्ये उद्धव ठाकरेंनी आमदारांशी चर्चा केली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'मातोश्री'बाहेर होर्डिंग
मुंबईत मातोश्री परिसरात शिवसेनेकडून होर्डिंग लावण्यात आले आहेत. होर्डिंगमधून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं नाव पुढे करण्यात आलं आहे. याआआधी हीच ती वेळ म्हणत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करण्यात आलं. तसे होर्डिंगही शिवसेनेकडून लावण्यात आले होते. आता शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचं नाव पुढे करणार याकडे नजरा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या
संजय राऊत शरद पवारांना भेटण्यासाठी दिल्लीला जाणार, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या हालचालींना वेग