मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये पाऊणतास चर्चा झाली. या बैठकीत शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव दिल्याचं कळतं. वांद्र्यातील 'ताज लॅण्ड्स एण्ड'मध्ये या दोन्ही नेत्यांची बैठक झाली. बैठकीत शरद पवार यांच्यासोबत अजित पवार, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. तर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेही 'मातोश्री'वरुन 'ताज लॅण्ड्स एण्ड'मध्ये पोहोचले. शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन काम करणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत झाल्याचं कळतं.

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आता खुद्द उद्धव ठाकरेच शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. सत्ता स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची समजली जात आहे. कदाचित इथून राज्यातील नव्या सत्तासमीकरणाला सुरुवात होईल.

भाजप सत्तास्थापनेसाठी असमर्थता दर्शवल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण पाठवलं आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे. संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा, बातचीत, बैठकीच्या फैऱ्या सुरु आहेत. त्याचा पुढचा भाग म्हणून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज भेट झाली आहे.

पाठिंब्यासाठी आम्हाला अद्याप कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही, असं शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वारंवार सांगितलं होतं. त्यामुळे आजच्या बैठकीत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीला अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे दुपारी 4.30 नंतरच स्पष्ट होईल. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. त्यानंतर 4.30 वाजता काँग्रेस आपला निर्णय जाहीर करेल. तेव्हाच राष्ट्रवादीही भूमिका स्पष्ट करणार आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Government Formation | युतीबद्दल संध्याकाळी 4.30 नंतर भूमिका जाहीर करु : सुधीर मुनगंटीवार

शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार, अरविंद सावंत राजीनामा देणार

शिवसेना-भाजप युतीची घोषणा; मात्र जागावाटप अजूनही गुलदस्त्यात, कारण...

Maharashtra Government Formation | ...असा असेल भाजपचा "गेम ऑफ पेशन्स!