मुंबई : शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र उशीर झाल्याच्या मुद्यावरुन आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपली आहे. शरद पवारांमुळे पत्र द्यायला उशीर झाला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केला होता. याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये असल्याने चर्चेत अडचणी आल्या. तसंच काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो.


आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंब्याचं पत्र त्यांना मिळू शकलं नाही. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत पुरेसं संख्याबळ नसल्याने शिवसेना सोमवारी (11 नोव्हेंबर) सत्ता स्थापन करु शकली नाही. त्यामुळे तिसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. राज्यपालांनी राष्ट्रवादीलाही शिवसेनेप्रमाणे 24 तासांची मुदत दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीकडे आज रात्री 8.30 वाजेपर्यंतची वेळ आहे.

पवारांच्या म्हणण्यावरुन चर्चा एक दिवस पुढे : माणिकराव ठाकरे
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळूनच बहुमत होत आहे. शिवसेनेने पक्षनेतृत्त्वाशी फोनवरुन बोलणी केल्यानंतरच चर्चेची बोलणी झाली. मग राज्यातील काँग्रेस नेत्यांना चर्चेसाठी बोलावणं आलं. त्यांच्या मतमतांतर होती. परंतु निर्णय झाल्यानंतर सोनियां गांधींनी शरद पवारांशी चर्चा केली. मात्र आपण चर्चा करुन घेऊ, त्यानंतर पुढची पावलं टाकता येतील, असं पवारांनी सांगितलं. त्याच्या म्हणण्यावरुनच चर्चा एक दिवस पुढे गेली. शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी वेळच कमी मिळाला. त्यांना दोन्ही पक्षांसोबत चर्चा करायची, असं पवार साहेबांचं म्हणणं होतं. त्यामुळे 24 तासात सत्ता स्थापनेचा दावा शक्य झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना संपर्कात आहेत. गरज पडल्यास शिवसेनेसोबत चर्चा करता येईल, असं माणिकराव ठाकरे म्हणाले.

आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो : अजित पवार
संपूर्ण दिवस आम्ही काँग्रेसच्या पत्राची वाट पाहत होतो. आम्ही एकट्याने पत्र देऊन काही उपयोग नव्हता. काँग्रेसचे आमदार जयपूरमध्ये आहेत. इथे सगळे असते, तर निर्णय घ्यायला सोपं झालं असतं. काँग्रेस सोबत आली तरच मार्ग निघू शकतो, असं म्हणत अजित पवार यांनी माणिकराव ठाकरेंच्या दाव्याला उत्तर दिलं आहे.

संबंधित बातम्या