नागपूर: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीच्या निकालाची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नागपूर विभागाचा निकाल 97 टक्के लागला. राज्यात विभाग चौथ्या स्थानावर असून विभागातील निकालात नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. गेल्या वर्षी निकालाचा टक्का 99.84 इतका होता. विशेष म्हणजे यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून विभागात 98.18 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 

विभागातही मुलीच अव्वल 

बारावीप्रमाणे दहावीतही मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत कमी संख्येने बसूनही जास्त टक्केवारीसह उत्तीर्ण झाल्या आहे. यामध्ये यावर्षी 78 हजार 987 मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी 75 हजार 739 मुले उत्तीर्ण झाल्यात. त्यांची टक्केवारी 95.88 इतकी आहे. याशिवाय दहावीची परीक्षा 74 हजार 752 मुलींनी दिली. त्यापैकी 73 हजार 394 मुली उत्तीर्ण झाल्यात. त्याची टक्केवारी 98.18 इतकी आहे.

फेरपरीक्षेत 82 टक्के उत्तीर्ण

दहावीच्या निकालात यंदा फेरपरीक्षार्थीच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झालेली आहे. विभागात 82.01 टक्के फेरपरीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी दहावीच्या परीक्षा 3 हजार 441 विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी 2 हजार 415 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

     विभागनिहाल निकाल

नागपूर 97.93
भंडारा 97.26
गोंदिया 97.07
वर्धा 96.24
चंद्रपूर 95.97
गडचिरोली 95.62

गेल्यावर्षी वर्धा जिल्हा होता प्रथम स्थानावर

दहावीच्या परीक्षेत 1 लाख 55 हजार 360 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 53 हजार 739 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 49 हजार 133 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. यामध्ये सर्वाधिक नागपूर जिल्ह्याने 97.93 टक्क्यासह प्रथम स्थान प्राप्त केले. दुसऱ्या स्थानावर भंडारा जिल्ह्याने 97.26 टक्के तर तिसऱ्या स्थानावर 97.07 टक्क्यासह गोंदिया जिल्हा आहे. गेल्यावर्षी वर्धा जिल्हा प्रथम स्थानावर होता. 

पुरवणी परीक्षा कधी?

बारावीचा पुरवणी परीक्षा ही 21 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे. तर दहावीमध्ये अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा ही 27 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत घेण्यात येणार आहे.या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. 

100 टक्के गुण मिळवणाऱ्यामध्ये नागपूर विभागाचा एकही विद्यार्थी नाही

100 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नागपूर विभागाच्या एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. मात्र  लातूर विभागात तब्बल 70 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. तर औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात 18-18 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळविले आहे. यानंतर आमरावती विभागात 8 विद्यार्थ्यांनी, पुणे विभागात 8 विद्यार्थ्यांनी, तर मुंबई, नाशिक आणि कोकण विभागात प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळविले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra ssc result 2022 declared : दहावीचा निकाल 96.94 टक्के! कोकण विभागाची बाजी, जाणून घ्या विभागनिहाय निकाल

SSC Result 2022 : 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, 29 शाळांचा निकाल शून्य टक्के, दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI