SSC Board Exam Paper : मुंबई : दहावीच्या (SSC Exams) विज्ञान भाग - 1 विषयाच्या बोर्डाच्या (Maharashtra Board) पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार आहेत. आमदार कपिल पाटील (MLA Kapil Patil) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोर्डाकडून दखल घेत शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. 18 मार्च रोजीच्या दहावी विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 1 मधील 'सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा' या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. या आशयाचे संदर्भीय पत्र या बोर्डाच्या कार्यालयास प्राप्त झालं आहे.
पाठ्यपुस्तकानुसार सदर प्रश्नाचं अचूक उत्तर 'हेलियम' हे आहे. तर काही संदर्भपुस्तकांमध्ये याचे उत्तर 'हायड्रोजन' असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगानं पुणे विभागीय मंडळानं संबंधित विषयाच्या विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतले असून त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, वरील दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं उपरोक्त प्रश्नाचे उत्तर 'हेलियम' किंवा 'हायड्रोजन' लिहिले असल्यास ते ग्राह्य धरून गुणदान करावं, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित विषयाचे सर्व नियामक आणि परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात सूचना देण्यात याव्यात, असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
आमदार कपिल पाटलांचं मंत्री दीपक केसरकरांना पत्र
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी इयत्तेच्या विज्ञान एक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. आमदार कपिल पाटील यांची ही मागणी मान्य झाली तर दहावीच्या विद्यार्थ्यांना संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांसाठी अतिरिक्त गुण मिळू शकतील.
'त्या' प्रश्नावरुन संभ्रम काय निर्माण झाला?
कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, "हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची 'बॅन दे वॉल्झ' (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे."
"या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा.", अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI